शेंदुरजनाघाट येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिलेसाठी तर शेजारच्या वरुडचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीमधील पुरुष किंवा महिला यापैकी कुणीही अशाप्रकारे आरक्षित झाल्याने दोन्ही शहरातील इतर संवर्गातील इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. शहरी क्षेत्राची ही स्थिती असतानाच वरुडच्या पंचायत समितीचे सभापतीपद आणि जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघही (सर्कल) याच संवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे वरुड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण थंडावले आहे. राज्य शासनाच्या ताज्या निर्णयानुसार यावर्षीपासून नव्याने आरक्षण (शून्य आरक्षण) निश्चित करण्यात आले. त्यानुसार आरक्षण सोडतीदरम्यान तालुक्यातील दोन्ही नगर परिषदांचे नगराध्यक्षपद आणि वरुड या एकमेव पंचायत समितीचे सभापतीपद तसेच जिल्हा परिषदेचे दोन सर्कल अनुसूचित जमातीकरिता (एसटी) आरक्षित झाले. ऐनवेळी ही स्थिती स्पष्ट झाल्याने तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थंडबस्त्यात पडली आहे. या तालुक्यात वरुड व शेंदुरजनाघाट या दोन नगरपरिषदा असून वरुड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीसाठी तर शेंदुरजनाघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. वरुड तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच मतदारसंघ (सर्कल) आहेत. या पाचपैकी पुसला व बेनोडा हे दोन सर्कल अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाले असून वरुड पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाले आहे. अशा विचित्र स्थितीमुळे इतर संवर्गातील इच्छूकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या इच्छूकांनी गेल्या चार वर्षापासून ठिकठिकाणी मतदारांच्या संपर्कात राहून विविध प्रकारे आपला चेहरा लोकापर्यंत पोहोचवला होता. एका अर्थाने ते या पदांसाठीचे प्रमुख दावेदार बनले होते. परंतु आरक्षणाची घोषणा झाल्यामुळे त्यांना आपली दावेदारी आता मागे घ्यावी लागत आहे. काहींच्या मते आम्ही गेल्या चार वर्षांपासून तयारी करीत होतो. परंतु आरक्षणामुळे आमच्या मेहनतीवर पूर्ण पाणी फेरल्या गेले. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा उत्साह सध्यातरी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mdvqxJb
वरुड तालुक्यात अनेक जागा आरक्षित, इच्छुकांचा हिरमोड:जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकांचे राजकारण थंडावले
October 25, 2025
0