मुंबईच्या भायखळा परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणाने ब्रेकअपनंतर प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर या तरुणाने स्वतःचा गळा चिरला. त्यात त्याचा मृत्यू झाला. काळाचौकी भागातील नर्सिंग होममध्ये ही भयंकर घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळाचौकी येथील रहिवासी सोनू बरईचे २४ वर्षीय मनीषा यादवसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तो तिच्यावर वारंवार संंशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात जोरदार खटके उडाले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. तेव्हापासून तो संतापाने धुसफुसत होता. शुक्रवारी सकाळी त्याने काळाचौकी येथे मनीषाला भेटायला बोलावले. तो सोबत स्वयंपाकघरातील चाकू घेऊन आला होता. मनीषा येताच त्याने तिच्यावर चाकूने सपासप दोन ते तीन वार केले. रक्ताने माखलेली ती जीव वाचवण्यासाठी धावत सुटली आणि एका नर्सिंग होममध्ये शिरली. सोनूही तिच्या मागे धावत शिरला आणि त्याने पुन्हा तिच्यावर वार केले. नर्सिंग होममधील लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण सोनू संतापलेला होता. त्याच्या हातात रक्ताने भरलेला चाकू होता. म्हणून तेथील एकाने त्याला जोरात दगड मारला. दगडाचा मार एवढा जोरात होता की त्याला तेथून पळून जाणे शक्य झाले नाही. मग त्याने चाकूने स्वत:चाच गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या मनीषा यादवला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/b8fsqrZ
प्रेयसीवर चाकूहल्ला करून तरुणाने केली आत्महत्या:ब्रेकअप झाल्याने चिडला, तरुणी गंभीर जखमी, मुंबईच्या काळाचौकी भागातील घटना
October 24, 2025
0