पूर्व विदर्भात एकमेव सुस्थितीत सुरू असलेला भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ सध्या आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. सर्वत्र खासगी दूध संघाचे वाढलेले जाळे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्यांच्याकडे असलेला ओढ यामुळे जिल्हा दूध संघाकडे दूधाची आवक घटली आहे. त्यामुळे संघाला शेतकऱ्यांनी अधिकाधिक दूध पुरविण्याचे आवाहन केले जात आहे. भंडारा जिल्हा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन यशाची शिखरे गाठली आहे. उत्कृष्ट संघ म्हणून भंडारा दूध संघाला गौरविण्यातही आले आहे. एकेकाळी या संघाचा दूध पुरवठा लाख लिटरच्या वर गेला होता. कालांतराने खासगी दूध संस्थांचे पेव फुटले. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना भूरळ पाडून आपल्याकडे ओढले. परिणामी, भंडारा दूध संघाकडे येणारे दूध खासगी संस्थांकडे वळले. सध्यास्थितीत भंडारा संघाला साधारणत: ३० हजार लिटरचा पुरवठा होत आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधील दूध संघ बंद पडले असताना भंडारा जिल्हा दूध संघ टिकून आहे. परंतु, आता दूधाचा पुरवठा कमी आणि खर्च वाढत आहे. भंडारा संघाचा प्रतिमहिना खर्च ६० ते ७० लाख रुपये आहे. संघाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने वेळीच संघाला मदत करावी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भंडारा संघाला अधिकाधिक दूध पुरवावा, असे आवाहन भंडारा दूध संघाकडून केले जात आहे. संघाचे उत्पादन राज्याबाहेर भंडारा दूध संघाकडून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. यातील सुगंधित दूध आणि हलवा राज्याबाहेर जात आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून शिशु संजीवनी योजनेंतर्गत कुपोषित माता बालकांसाठी शक्तीवर्धक हलवा तयार करण्याचे काम या संघाला मिळाले आहे. दर महिना दीड लाख हलव्याचे पाऊच तयार करुन ते आदिवासी भागातील कुपोषित माता बालकांसाठी पाठविले जात आहे. या हलवा उत्पादनातून भंडारा संघाला आर्थिक पाठबळही मिळत आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fE3ti2L
भंडारा दुग्ध संघाची अस्तित्वासाठी धडपड:पूर्व विदर्भात एकमेव संघ सुरू, संघाला दूध पुरविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
October 04, 2025
0