विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी व समृद्धीचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने निवडणुकीनंतर जनतेचा विश्वासघात केला आहे. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू असे सांगणारे मुख्यमंत्री निर्लज्जतेची हद्द पार करत आहेत. दररोज शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार मात्र निव्वळ घोषणांवर थांबले आहे, राज्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या, तो आकडा सांगावा असा तीव्र आरोप खासदार अमर काळे यांनी आंदोलनात केला. वर्धेतील महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळी दिवाळी म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खा.काळे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस, कर्जमाफीपूर्वी अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्यात? तो आकडा तरी स्पष्ट करा. असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.आपण विरोधक आहोत, नाले-रस्ते बनवणे हे आमचे काम नाही. आम्हाला शेतकरी सुखी हवा, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी,असा रोखठोक संदेश त्यांनी दिला.या आंदोलनातून शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ द्यावी, सोलर सक्ती बंद करावी, ओला दुष्काळ जाहीर करून मदत वाढवावी, विहिरीच्या अनुदानात वाढ करावी, तसेच अडकलेली कंत्राटदारांची देयके तातडीने द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या न मानल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या धरणे आंदोलनात माजी पालकमंत्री रणजीत कांबळे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, अतुल वांदिले, मनोज चांदुरकर, शेखर शेंडे, डॉ. अभुदय मेघे, महेंद्र मुनेश्वर, बाळा माऊसकर,ॲड. अविनाश काकडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TcNv4Ht
वर्ध्यात महाविकास आघाडीचे काळी दिवाळी आंदोलन:मुख्यमंत्र्यांनी सांगावे; कर्जमाफीच्या घोषणेसाठी राज्यात किती आत्महत्या हव्यात- खा. काळे
October 23, 2025
0