Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे अक्षय पारसकर भाजपमध्ये:नांदगाव खंडेश्वरमध्ये शेवटच्या दिवशी 11 नगराध्यक्ष, 87 नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजकीय घडामोडींनी वेग घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांना धक्का दिला. याचवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता नगराध्यक्ष आणि सर्व १७ नगरसेवक पदांसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी युती केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचीही युती झाल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या युतींनीही नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदांसाठी अर्ज भरले. भाजपमधील बंडखोरी स्पष्टपणे समोर आली. भाजपच्या बंडखोर सुरेखा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, भाजपच्या कल्पना मारोटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – शिवसेना (शिंदे गट) युतीकडून उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग १७ मधून भाजपचे विशाल गुल्हाने यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्षानेही काही प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत. नांदगाव खंडेश्वर शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. शहरात एकूण १२,०३९ मतदार असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९८ उमेदवारांनी आपले अर्ज भरले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ११ आणि नगरसेवक पदासाठी ८७ अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी जाधव, नगर पंचायतीचे प्रशासक निवृत्ती भालकर, सर्व कर्मचारी तसेच ठाणेदार श्रीराम लांबडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NT3Q1a0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.