जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यावर दगड मारून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक करून मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश केला. ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी या टोळीने कट रचून हा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोघे हे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भारत राजेंद्र रूपेकर (३०, रा. नानेगाव, ता. पैठण, मुख्य आरोपी), विष्णू कल्याण बोधणे (२४, रा. नानेगाव), सचिन विठ्ठल सोलाट (२५, रा. राहुलनगर, जायकवाडी, ता. पैठण), विशाल दामोदर चांदणे (२४, रा. अखातखेडा, ता. पैठण). पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी (कार), रोख रक्कम आणि ८ मोबाइल जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. ही घटना शनिवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात घडली होती. पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेसाठी २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारे सेवानिवृत्त कर्मचारी गणेश आनंद पहिलवान (६५) हे स्कूटीवरून जात असताना दुचाकीवरील दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांनी स्कूटीला कट मारून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगड व लाथ मारून पहिलवान यांना खाली पाडून त्यांच्या हातातील २५ लाखांची बॅग हिसकावून घेतली आणि डेरामार्गे पसार झाले. २ आरोपी ग्रा.पं. सदस्यांचे पुत्र; चौघात वाटले २५ लाख आरोपी रूपेकरची संशयास्पद कृती दरोड्याचा मुख्य सूत्रधार भारत रूपेकर हा मागील दोन वर्षांच्या कालावधीनंतर दावरवाडी शाखेमध्ये गेला होता. त्याने बँकेत पैसे जमा करण्याची स्लिप भरली, पण त्यात पत्नीचा मोबाईल नंबर टाकला. रूपेकरचे स्वतःचे गाव नानेगाव असतानाही त्याने दोन वर्षांनी याच शाखेत व्यवहार का केला, या प्रश्नाने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून कसून चौकशी केली. याच संशयावरून पोलिसांनी रूपेकरला ताब्यात घेत तपास केला, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा मोबाइल नंबर ठरला कळीचा दुवा दरोड्याचा हा प्लॅन मुख्य आरोपी भारत रूपेकर याने पूर्ण आठ दिवस रेकी करून तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी रूपेकरने बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची स्लिप भरली. मात्र, त्याने स्वतःचा नव्हे, तर पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर टाकला होता. रूपेकरच्या स्वतःच्या गावात बँक असतानाही त्याने याच शाखेत व्यवहार का केला, यावरून पोलिसांचा संशय बळावला. दरोड्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरू केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व व्यवहारांच्या स्लिप तपासल्या. स्लिपवरील पत्नीच्या नंबरवरून पोलिसांनी रूपेकरला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिव्य मराठी इनसाइड - बँकेचा हलगर्जीपणा उघड; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर दिली होती जबाबदारी या घटनेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी गणेश पहिलवान यांच्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पहिलवान हे २५ लाख रुपयांची रोकड गोणीत भरून स्कूटीवर पायाजवळ ठेवून नेत होते. इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक करताना कोणताही सुरक्षा कर्मचारी, वाहन किंवा मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसणे ही बँकेची गंभीर हलगर्जी असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. ही यशस्वी कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे आणि विठ्ठल डोके यांच्या पथकाने पार पाडली. आणि अवघ्या आठ तासांत दरोड्याचा उलगडा झाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KfrlWdn
कर्ज फेडण्यासाठी बँक कर्मचाऱ्याची लूट; पत्नीच्या मोबाइल नंबरमुळे सूत्रधार जाळ्यात:25 लाखांच्या दरोड्याचा आठ तासांत पोलिसांकडून पर्दाफाश
November 16, 2025
0