Type Here to Get Search Results !

कल्पनाचा अफगाणी मित्र, अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक:शुक्रवारी रात्री उशिरा केली कारवाई, 19 कोटींचा चेक देणाऱ्याचीही चौकशी

छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात अफगाणी नागरिक अशरफ खील याच्यासह स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणवून घेत खुलेआम फिरणाऱ्याला दिल्लीहून ताब्यात घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कल्पना भागवतला सिडको पोलिसांनी २२ जून रोजी अटक केली होती. खाडाखोड केलेले आधार कार्ड, २०१७ च्या आयएएस निवड यादीची बनावट प्रत आणि स्वतःचे घर असतानाही तब्बल सहा महिने शहरातील पंचतारांकित ‘अॅम्बेसेडर’ हॉटेलात राहण्यामागील तिची आर्थिक ताकद पोलिसांना संशयास्पद वाटत होती. याचदरम्यान तिची मैत्री दिल्लीतील ड्रायफ्रूट व्यापारी आणि अफगाणिस्तानचा नागरिक अशरफ खील याच्याशी झाली. कल्पनाच्या खात्यातील ३२ लाखांची उलाढाल त्याच्याशी जोडली गेल्याचा संशय आहे. अशरफचा गालिब यमा नावाचा भाऊ पाकिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे. कल्पनाच्या मोबाइलमध्ये गालिबसोबतचे चॅट डिलिट केलेले आढळले होते. शेटे व लोढा यांची चौकशी २०१७ च्या लोकसेवा आयोगाची निवड यादी कल्पनाला मनोज लोढा व दत्तात्रय शेटे यांनी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात त्यांनादेखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांनी बनावटगिरी कोणत्या उद्देशासाठी केली याचादेखील तपास होणार आहे. अनुत्तरित प्रश्न १. कल्पना भागवत आयएएस असल्याचे का सांगत होती? २. पाकिस्तान, अफगाण, दुबई कनेक्शनमागे नेमका उद्देश काय होता? ३. ३२ लाखांच्या व्यवहाराचे मूळ स्रोत कोण? ४. १९ कोटींचा चेक खरा की फसवे दस्तऐवज? ५. केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा ओएसडी सांगणाऱ्याची प्रकरणात भूमिका काय? १९ कोटींचा चेक मी दिलाच नाही, भानुशाली यांचा चौकशीत दावा कल्पनाच्या घरझडतीत तिच्या आणि निखिल भाकरे या दोघांच्या नावाने असलेला १९ कोटी रुपयांचा चेक आढळला होता. हा चेक देणारे चेतन भानुशाली यांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले. दिवसभर चौकशी केल्यानंतरही त्यांनी हा चेक मी दिलाच नाही, असा दावा केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, सिडको पोलिसांनी कल्पनाशी संबंधित पाच ते सहा जणांची शुक्रवारी कसून चौकशी केली. त्यात काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पण, प्रकरण हेरगिरीचे आहे की तोतयेगिरीचे याचे गूढ अद्यापही कायम आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/HtQPLjO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.