मुंब्रा अपघात प्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन (सीआरएमएस) या संघटनेने गुरुवारी सायंकाळी सीएसएमटी स्थानकात अचानक आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोटरमनदेखील सहभागी झाल्याने मध्य रेल्वेमार्गावरील लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी तासभर ठप्प झाली. या आंदोलनामुळे लोकल सेवा खोळंबली आणि अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान अंबरनाथ लोकलने रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना धडक दिली. चारही प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डाॅक्टरांनी यापैकी दोघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये हेल्ली मोहामाया या १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तर अन्य मृत प्रवाशाची अजून ओळख पटलेली नाही. जखमी असलेल्या २२ वर्षीय कैफ चोघळे आणि ४५ वर्षीय खुशबू या दोन प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. ४० मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प राहिल्याने गर्दी ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन’च्या नेतृत्वाखाली ५० ते ६० मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ४० ते ५० मिनिटे स्थानकातच खोळंबल्या. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आणि त्यातच ही दुर्घटना घडली आहे. तब्बल एक तास लोकल बंद राहिल्याने कल्याण, पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. टिटवाळा, कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, पनवेल, वाशी, वांद्रे लोकलचे वेळापत्रक बिघडले. आंदोलक कामावर रुजू, तासाभरानंतर लोकल सुरू लोकल सेवा ठप्प झाल्याने रेल्वे प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तात्काळ चर्चा सुरू केली. या चर्चेंनतर आंदोलनकर्ते कर्मचारी कामावर परतू लागताच वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. सायंकाळी ५.५० वाजता ठप्प झालेली लोकल सेवा सायंकाळी ६.४५ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी स्पष्ट केले. त्यासोबत इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रकही सुरळीत होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मजदूर युनियनचे आंदोलन कशामुळे होते? हे आंदोलन मुंब्रा येथे ९ जुन रोजी झालेल्या रेल्वे अपघातप्रकरणी दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ होते. अपघाताच्या अंतर्गत चौकशीत, सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी पावसाने रुळाखालील माती खचल्याची माहिती असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. याच दुर्लक्षामुळे ५ प्रवाशांचा बळी गेल्याचा ठपका या तक्रारीत केला आहे. ‘गटबाजी’मुळे निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZUSF7RY
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गर्दी, लोकलच्या धडकेत 2 ठार:मुंबईत सीएसएमटी स्थानकावरील दुर्घटना, दोन जण जखमी
November 06, 2025
0