शहरातील पंचतारांकित हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये ६ महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या कल्पना भागवत (४५) या महिलेच्या चौकशीत तिचा बॉयफ्रेंड अशरफ खलील हा अफगाणिस्तानमध्ये वास्तव्यास असून त्याचा भाऊ आबेद पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या दोघांच्या खात्यातून मोठ्या रकमा या महिलेच्या खात्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोघा भावांचे पासपोर्ट व व्हिसाचे फोटोही महिलेच्या मोबाइलमध्ये आहेत. पाकिस्तानातील आबेदने भारतात येण्यासाठी तयार केलेल्या अर्जाचा फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोमवारी (२४ नोव्हेंबर) तिची एटीएस (दहशतवादविरोधी पथक) व आयबीकडून चौकशी करण्यात येत आहे. ती परदेशी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय आहे. सिडको पोलिसांच्या तपासणीत कल्पना भागवतच्या आधार कार्डमध्ये खाडाखोड आढळली होती. तिने पोलिसांच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तिला अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीतील चौकशीत तिच्या खात्यात गेल्या वर्षभरात तब्बल ३२ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यातील आता केवळ ११०० रुपये तिच्या खात्यात शिल्लक आहेत. तिच्या मोबाइलमध्ये अफगाणिस्तानसह अन्य काही देशांतील फोन नंबर आहेत. याबाबत पोलिस यंत्रणेने वरिष्ठ पातळीवर अहवाल दिल्यावर एटीएस व आयबीने तिची चौकशी सुरू केली आहे. तसेच प्रभारी पोलिस आयुक्त व विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनीही तपासाचा आढावा घेतला. राष्ट्रपती, गृहमंत्र्यांसोबतही फोटो पोलिसांनी कल्पनाचा मोबाइल जप्त केला असून त्यामध्ये देशातील मोठ्या नेत्यांसोबत फोटो तसेच त्यांचे संपर्क क्रमांक आढळून आले. विशेष म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबतही तिचे फोटो आहेत. कल्पनाची यापूर्वीही एटीएसने चौकशी केली होती. २०२१ मध्ये शरद पवार यांच्या ताफ्यात कल्पना विनापरवाना शिरल्याने तिला एटीएसने ताब्यात घेतले होते. चौकशी करून तिला सोडून दिले होते. अफगाणिस्तानहून अशरफ आला होता शहरात काही दिवसांपूर्वी एसएफएस मैदानावर ड्रायफ्रूट्सचे प्रदर्शन भरले होते. त्या वेळी अशरफनेही स्टॉल टाकला होता. त्या वेळी कल्पना त्याला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. तिने २०१३ मध्ये विद्यापीठात पदवी आणि टायपिंगच्या आधारावर आस्थापना विभागात काम केले. तसेच विद्यार्थी कल्याण विभागातही काही काळ काम केले. परंतु न सांगता गैरहजर राहिल्याने विद्यापीठाने कामावरून काढले होते. वर्किंग स्टेटससाठी बड्या हॉटेलात वास्तव्य कल्पनाचे घर पडेगावातील चिनार गार्डनमध्ये आहे. सी विंगमध्ये १३ नंबरच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये ती राहत होती. २००५ मध्ये कल्पनाच्या वडिलांनी ते घर खरेदी केले होते. वडील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कल्पना व तिची आई दोघी चिनार गार्डन येथे राहत होत्या. २०२० नंतर कल्पना व तिची आई घर सोडून शहरामध्ये भाड्याने रूम करून राहत होत्या. तिला बडेजाव करण्याची सवय होती. काही मोठ्या लोकांच्या संपर्कातही होती. वर्किंग स्टेटस राखण्यासाठी तिने पंचतारांकित हॉटेल ॲम्बेसेडरचा पर्याय निवडल्याची प्राथमिक माहिती आहे. सहा महिन्यांत तिने हॉटेल स्टाफ किंवा हाऊसकीपिंगलाही आत येऊ दिले नव्हते. पोलिसांनी तिच्या रुमची झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता दिसून आली. पोलिस व्हॅनमध्ये बसताना म्हणाली, ‘मी पुढे बसणार’ सिडको पोलिस ठाण्यातून महिलेला पडेगाव परिसरातील तिच्या घराच्या झडती करण्यासाठी नेण्यात येत होते. त्या वेळी आरोपीला मागच्या सीटवर बसवतात, मात्र या महिलेने थेट ‘मी पुढे बसणार’असे फर्मान सोडले. त्यामुळे सर्वच पोलिस अवाक् झाले. तिच्या डोक्यात अधिकारी असल्याचे बसलेले दिसून येत होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iO8GWgJ
फाइव्ह स्टारमध्ये राहणाऱ्या महिलेच्या अफगाणी बॉयफ्रेंडचे पाकशी कनेक्शन:वर्षभरात महिलेच्या खात्यात आले 32 लाख, आता उरले फक्त 1100 रुपये
November 24, 2025
0