राज्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर कुरघोडी सुरू झाल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केल्यामुळे शिवसेना शिंदे गट देखील एकट्याने लढण्याची तयारी दर्शवत आहे, परिणामी भाजप नेते नितेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राणेंच्या वक्तव्यानंतर केसरकर यांनी शिवसेनेची तयारी असल्याचे म्हटले होते, आणि आता पुन्हा एकदा त्यांनी नितेश राणेंवर टीका करत स्वबळाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याची सूचना केली आहे. दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना घराचा आहेर देत, पालकमंत्री म्हणून राणेंनी भान ठेवायला हवे, अशा शब्दांत सुनावले आहे. केसरकर म्हणाले की, जर महायुती म्हणून निवडणूक लढवली असती, तर कणकवलीमध्ये आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती झाली नसती. आपला सुरुवातीपासून महायुती म्हणून लढण्याचा आग्रह होता आणि मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांचीही युतीला संमती होती. पण नेमके कुठे बिघडले, हे माहीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीपक केसरकर पुढे म्हणाले की, पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी स्वतः युतीसाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. गेले वर्षभर आमदार म्हणून नितेश राणेंच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, त्यामुळे युतीबाबत त्यांनी अजूनही विचार करावा. आम्ही नेहमी लवचिक आहोत, महाराष्ट्रात जशी महायुती भक्कम आहे, तशी ती कोकणात राहावी, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणत केसरकरांनी युतीचा आग्रह धरला आहे. त्यामुळे, यावर नितेश राणे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, जरी त्यांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर भाषणात स्पष्ट केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान हिंदूंनीच दुकाने लावावीत- नितेश राणे मंत्री नितेश राणे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान हिंदूंनीच दुकाने लावावीत, असे विधान केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या या विधानामुळे हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, या विधानानंतर नाशिकमधील साधू-महंतांनी याचे स्वागत केले असून, ज्यांना हिंदू धर्म आणि देव-देवतांची पूजा मान्य नाही, अशा लोकांच्या व्यवसायांवर कुंभमेळ्याच्या काळात सरकारने निर्बंध घालावेत, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oXg7GM4
पालकमंत्री म्हणून भान ठेवले पाहिजे:दीपक केसरकरांकडून नितेश राणेंना घरचा आहेर, महायुतीत वादाची ठिणगी!
November 07, 2025
0