राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, मनसेला मोठा धक्का बसला आहे. 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी, जे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशापूर्वी, 6 नोव्हेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील शाखाध्यक्षांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर, राज ठाकरे परदेशी यांच्यावर संतापले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. त्यावेळी रमेश परदेशी यांनी स्पष्टीकरण दिले होते की, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे राज साहेब त्यांना ठाकरे शैलीत बोलले होते. मात्र, या घटनेनंतर परदेशी यांनी पुन्हा फेसबुकवर तसाच फोटो पोस्ट केल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि ती आता खरी ठरली. रमेश परदेशी यांची प्रतिक्रिया भाजप प्रवेशाबद्दल बोलताना रमेश परदेशी म्हणाले की, मी भारतीय संघाचा स्वयंसेवक आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत मी गेली वीस वर्षे काम केले आहे. मात्र, बदललेली परिस्थिती, कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी तसेच माझ्यावर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कणखर देश चालवत आहेत, त्याप्रमाणे मराठी सिनेमाच्या आणि संबंधित अडचणी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज साहेबांनी सुनावले असे काही नसून, प्रश्न हा संसाराचा आणि तत्वांचा आहे, असे स्पष्टीकरण देत रमेश परदेशी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3f7aCNs
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का!:'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपमध्ये प्रवेश
November 18, 2025
0