Type Here to Get Search Results !

पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारणात 'पुनरागमन':कराड नगरपालिका निवडणुकीवर केले भाष्य, म्हणाले- आघाडी न झाल्याने कॉंग्रेस स्वतंत्र लढणार

आजारपणामुळे गेली तीन महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा त्यांनी दोन दिवस आढावा घेतला. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्वी सक्रिय होतोच, पण आता जास्त काळ मुंबईत सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामानानुसार दिल्लीलाही जाईन. कारण, माणूस जिवंत परत आला तर नशीब! इतकं दिल्लीचं हवामान वाईट आहे. प्रदूषणामुळे श्वास घेता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करणे शक्य झाले नसल्याने कराडमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. तर, मलकापुरात मात्र, निवडणूक न लढवता समविचारी उमेदवारांना मदत करेल अशी काँग्रेसची भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. काँग्रेसचे माजी कराड दक्षिण तालुकाध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाजपवासी झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. प्रकृतीच्या कारणास्तव काहीकाळ मुंबई, दिल्लीत उपचार घेवून दोन दिवसांपूर्वी कराडमध्ये आलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांकडून पालिका निवडणुकांतील नेमक्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. आपली तब्येत ठीक नसल्याने अनेक तपासण्या कराव्या लागल्या. आता प्रकृती सुधारत असल्याचे सांगताना, भाजपचा वारू रोखण्यासाठी समविचारींना सहकार्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः सभा घेणार आहे. प्रत्येक प्रभागात जाणे शक्य नसले तरी मोठ्या सभांद्वारे प्रचाराला वेग देताना, महाविकास आघाडीतील तसेच समविचारी उमेदवारांनाही आम्ही हातभार लावणार आहोत. कराडमध्ये महाविकास आघाडी शक्य न झाल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी नगराध्यक्ष आणि विविध प्रभागांत नगरसेवकपदासाठी १५ उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/phqk09b

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.