Type Here to Get Search Results !

'विरोधकांचा चक्रव्यूह भेदणार, आम्ही आधुनिक अभिमन्यू':देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट इशारा

कराड पालिका निवडणुकीत आपलेही आणि विरोधकही एक झाले आहेत. त्यांनी भाजपाला चारही बाजूने घेरलंय. महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरणं माहीत होतं. बाहेर पडणं माहीत नव्हतं. परंतु, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला ते माहिती आहे. विरोधकांचा चक्रव्यूह भेदून आम्ही कराड पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं थेट चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना दिलं. कराड नगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती भाषण केले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांना विरोधकांनी घेरलंय. त्यात आमचेही आहेत. आम्ही विरोधकांचा चक्रव्यूह भेदून दाखवू. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मी प्रत्येक शहरात जातोय. रोज पाच-सहा सभा घेतो. परंतु, कुठल्याही सभेत मी कुणावर टीका करत नाही. कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही. कारण, आपल्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. आम्ही काय केलंय आणि काय करणार आहोत, याच्या आधारावर मी मत मांडण्यासाठी आलोय, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मतदारांसमोर मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. देशाच्या संविधानाने लोकशाहीत आपल्याला काही अधिकार दिले असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना आणि तुम्हाला, मला सुद्धा एकच मत देता येतं. ते एक मत देताना योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपण देशाचा पंतप्रधान ठरवतो, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ठरवतो आणि शहरात मतदान करून आपल्या शहराचं प्रशासन पाच वर्ष कोण चांगलं चालवेल, याचा निर्णय आपण करत असतो. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवात आपण विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असं भावनिक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कराडकरांना केलं. प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पुनर्विकासाचा विचार आमदार अतुल भोसले यांनी मांडला आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कुणी केला नाही. एकदा जे काम झालं, त्यानंतर परत त्याच्याकडे कुणी पाहिलं नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लगावला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2FUcdR8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.