आगामी नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक वार्डातून दोन नगरसेवक आणि त्या शहरासाठी एक नगराध्यक्ष निवडायचा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन मते द्यावी लागणार आहेत. ही तिन्ही मते दिल्याखेरीज त्यांचे मतदान पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराने तीन मते देण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर संबंधित मतदान केंद्रांवरील केंद्राधिकाऱ्यांना त्या मतदाराचे उर्वरित मतदान पूर्ण करावे लागेल. एखाद्या मतदाराला एखाद्या प्रभागात कोणत्याच उमेदवाराला मतदान करायचेच नाही, असे वाटत असेल तर अशा मतदाराने त्या जागेसाठीच्या ‘नोटा’ या चिन्हावर मतदान करावे, असे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे. कारण तीन मते द्यायची असताना त्यापेक्षा कमी मते दिल्यास ते मतदान अपूर्ण राहते. समजा एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या मतदाराने तीन मते द्यायचे असताना दोनच मते दिली, तर त्या मतदाराचे तिसरे मत हे तेथे कर्तव्यावर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे लागेल.कारण तसे केल्याखेरीज ईव्हीएम हे पुढच्या मतदाराचे मत स्वीकारत नाही. मात्र असे केल्याने काही प्रकरणांमध्ये उगाच वाद निर्माण होऊ शकतो. निवडणूक यंत्रणेच्या मते संबंधित अधिकारी ‘नोटा’ची बटन दाबून त्या मतदाराचे मतदान पूर्ण करेलही. परंतु ती वेळच येऊ देऊ नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एखाद्याला दोनच मते द्यावी, असे वाटत असेल तर तिसरे बटन दाबल्याखेरीज ती प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्या पुढच्या मतदारालाही मतदान करता येणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. चार ठिकाणी घ्यावी लागेल चार मते जिल्ह्यात सध्या दहा नगरपालिका व दोन नगरपंचायती मिळून एकूण १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक होत आहे. यापैकी सर्वात मोठ्या 'अ' वर्ग या अचलपूर आणि दर्यापुर या ‘ब’ वर्ग नगरपालिकेसह नांदगाव खंडेश्वर व धारणी नगरपंचायतीतील एकेक प्रभाग हा तीन नगरसेवकांचा आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील मतदारांना एक नगराध्यक्ष आणि तीन नगरसेवक अशी एकूण चार मते द्यावी लागेल. ती चार मते पूर्ण झाल्याखेरीज संबंधित मतदाराचे मतदानच पूर्ण होणार नाही. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान हा प्रत्येकाचा बहुमूल्य अधिकार आहे. त्यामुळे तो बजावलाच पाहिजे. तसेही मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने त्यांच्या-त्यांच्या प्रभागातील नगरसेवकांच्या संख्येपेक्षा एक अधिक (जे नगराध्यक्षांसाठी असेल) एवढी मते द्यावीत. त्याशिवाय ते मतदान पूर्ण होत नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. - डॉ. विकास खंडारे, सहायक आयुक्त, नगरपालिका प्रशासन, अमरावती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/DTZMLu7
स्थानिक निवडणुका:मतदाराला 'तीन' किंवा 'चार' मते देणे अनिवार्य, अन्यथा मतदान अपूर्ण; केंद्राधिकाऱ्याला करावे लागेल उर्वरित मतदान
November 29, 2025
0