Type Here to Get Search Results !

कोल्हापूर पोलिसांची 'सुपरफास्ट' कारवाई!:बसवरील 1.22 कोटींचा दरोडा 12 तासांत उघड; 7 दरोडेखोर जेरबंद

कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी आराम बसवर कोयत्याचा धाक दाखवून 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेले संपूर्ण सोने, चांदी आणि मोबाईल सुटे भाग हस्तगत केले आहेत. ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घडली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या या बसमध्ये पार्सलद्वारे मौल्यवान दागिने आणि साहित्य नेले जात होते. दरोडेखोरांनी आधी या बसचा पाठलाग केला आणि निर्मनुष्य ठिकाणी बस अडवली. दरोडेखोरांनी क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि चालकाला बेदम मारहाण केली. या दहशतीच्या जोरावर त्यांनी 1 कोटी 22 लाख रुपयांचे सोने-चांदी आणि मोबाईलचे स्पेअर पार्ट्स लुटून पोबारा केला होता. पोलिस तपासाचे चक्रे फिरली घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अक्षय कदम (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. अक्षय कदमची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या सहा साथीदारांची नावे उघड केली. पोलिसांनी तातडीने छापेमारी करून सातही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या चातुर्यापुढे दरोडेखोरांचा डाव फसला. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वडगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pTdXLKP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.