सार्वजनिक बांधकाम विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती देत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी दोन नवीन ग्रीनफील्ड रस्त्यांकरिता ७४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे दोन्ही रस्ते औद्योगिक क्षेत्राला राष्ट्रीय महामार्ग आणि महत्त्वाच्या शहरांशी जोडणारे आहेत. हे रस्ते वाहतुकीला उपलब्ध होण्यास किमान ५ वर्षे लागू शकतात. हे ७४४ कोटी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (एआयआयबी), न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून (एनडीबी) कर्जावर मिळणार आहेत. कशामुळे दिली मान्यता छत्रपती संभाजीनगरजवळ ३२४५ एकरमध्ये वाळूज व २२५५ एकरमध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहती आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात १०,००० एकरवर नवीन स्मार्ट औद्योगिक शहर वसवले जात आहे. बिडकीन येथे टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर यासारख्या मोठ्या कंपन्यांचे उत्पादन युनिट्स कार्यरत होत आहेत. म्हणून वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. ग्रीनफील्ड रस्ता म्हणजे काय? ग्रीनफील्ड रस्ता पूर्णपणे नवीन, विकसित नसलेल्या वा कमी विकसित जमिनीवरून (उदा. शेतजमीन, मोकळी जागा) बांधला जातो. तो जुन्या, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे विस्तारीकरण वा सुधारणा केलेला नसतो. असे असतील ग्रीनफील्ड रस्ते 1 रस्ता : संभाजीनगर -जालना डीएमआयसी, करमाड ते बिडकीन सहापदरी. लांबी : अंदाजे ३२ किमी खर्च : भूसंपादनासह ३१५ कोटी रुपये. 2 रस्ता : बिडकीन-ढोरेगाव (पुणे-अहिल्यानगर रस्ता) सहापदरी. लांबी : अंदाजे ३५.८० किमी खर्च: भूसंपादनासह ४३० कोटी रुपये. पुढील २५ वर्षांसाठी आवश्यक- उत्सव माछर, अध्यक्ष, सीएमआयए हा पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक प्रगतीवर परिणाम करणारा निर्णय आहे. शेंद्रा-बिडकीन येथे पुढील काळात इलेक्ट्रिक व्हेइकलसह अनेक मोठ्या कंपन्या येणार आहेत. या कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारे आणि उत्पादन इतर शहरांत घेऊन जाणारे ट्रक छत्रपती संभाजीनगर शहराबाहेरूनच जावेत यासाठी हे रस्ते अत्यंत उपयुक्त ठरतील. दोन्ही रस्ते सहापदरी होतील, हे महत्त्वाचे. यामुळे वेळेची, इंधनाची मोठी बचत होईल. एकूणच औद्योगिक विकासाला गती मिळेल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KcoYutv
2 ग्रीनफील्ड रस्त्यांनी शेंद्रा-बिडकीन जोडणार:744 कोटी निधी मंजूर, किमान 5 वर्षे लागू शकतात
December 05, 2025
0