Type Here to Get Search Results !

उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू प्रकरण:तीन शिक्षण अधिकारी निलंबित, शिक्षण विभागाची मोठी कारवाई

पालघर जिल्ह्यातील वसई येथील सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून दिलेल्या उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित तीन शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थिनी काजल उर्फ अंशिका गौड हिला शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावल्या होत्या. या शिक्षेनंतर अंशिकाची प्रकृती बिघडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर आणि संतापजनक घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांवर, घटनेची माहिती वरिष्ठांना न देणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे आणि अनधिकृत शाळांवर वेळेत कारवाई न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसई पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे, आणि वालीव केंद्रप्रमुख कैलास चव्हाण यांचा समावेश आहे. वसईतील सातीवली परिसरात अनधिकृतपणे वर्ग चालत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, तरीही शिक्षण विभागाने त्यावर कोणतीही योग्य कारवाई केली नव्हती, ज्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. अशा निष्काळजीपणाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, हेच या कारवाईतून प्रशासनाने दाखवून दिले आहे. उशीर झाल्याने 100 उठाबशांची शिक्षा वसई पश्चिममधील सातीवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये ही संतापजनक घटना घडली. विद्यार्थिनी शाळेत पोहोचण्यासाठी अवघी दहा मिनिटे उशिरा आल्याचा राग एका शिक्षिकेला अनावर झाला. या रागातून शिक्षिकेने त्या विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. जीवापेक्षा मोठ्या असलेल्या या शिक्षेमुळे विद्यार्थिनीची तब्येत गंभीररीत्या बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी तातडीने शाळेत व रुग्णालयात जाऊन चौकशी केली, परंतु शनिवार असल्याने शाळेत कोणतेही रेकॉर्ड किंवा माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने आता मोठी कारवाई केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/t1rHEaL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.