नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुमसत असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि स्थानिक निवडणुकांवरून निर्माण झालेली कटुता विसरून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आज डोंबिवलीत एकाच मंचावर अवतरले. विशेष म्हणजे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांचे हस्तांदोलन करत केलेले स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत महायुतीत मोठी ठिणगी पडली होती. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल्याच्या चर्चा होत्या. यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, हे प्रकरण थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात पोहोचले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन, हे प्रकरण त्यांच्या कानावर घातल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता या ‘हायव्होल्टेज’ ड्राम्यावर पडदा पडल्याचे दिसत आहे. शिंदे गट आणि भाजपमधील वितुष्ट संपले? डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात हे मनोमिलन पाहायला मिळाले. मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत रवींद्र चव्हाण यांचे हसून स्वागत केले आणि हस्तांदोलन केले. त्यांच्या या एका कृतीने दोन्ही पक्षांतील तणाव निवळल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. चव्हाणांकडून शिंदेंच्या कामाचे कौतुक आपल्या भाषणात चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख 'कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार' असा केला. रविंद्र चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सतत महायुतीचा उल्लेख केला. "महायुती म्हणून आम्ही विकासाची कामे केली आहेत आणि पुढेही करत राहू. एकविचाराचे सरकार असले की विकास वेगाने होतो," असे सांगत त्यांनी वादाच्या चर्चांना बगल दिली. श्रीकांत शिंदे काय म्हणाले? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पार पडत आहेत. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर या कल्याण डोंबिवलीत निधी मिळू लागला आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर सर्वात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आल्याचे देखील श्रीकांत शिंदे म्हणाले. हे ही वाचा... देवाभाऊ त्यांचे आदर्श असतील तर त्यांची पूजा करावी:भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी; मंत्री संजय शिरसाटांनी सुनावले राज्याच्या राजकारणात महायुती स्थापन झाल्यानंतर सर्व काही स्थिर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे महायुतीत मोठा दुरावा असल्याचे चित्र समोर आले. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या महापौरपदावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शब्दीक खडाजंगीची नवी लाट उसळली आहे. लोढा यांनी एका कार्यक्रमात महापौरपद भाजपकडे येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्यावेळी देवाभाऊ शपथ देण्यासाठी येतील असे वक्तव्य केले. यामुळे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना रोखठोक प्रतिक्रिया द्यावी लागली आणि महायुतीतील तणाव पुन्हा एकदा सर्वांसमोर आला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच गडद होताना दिसत आहे. पूर्ण बातमी वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/G8mNtU6
'महायुती'चा सूर जुळला:एकनाथ शिंदे- रवींद्र चव्हाण एकाच मंचावर; खासदार श्रीकांत शिंदेंकडून हस्तांदोलन, राजकीय वादावर पडदा?
December 06, 2025
0