गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याचे पैसे न मिळाल्याने हवालदिल झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता न्यायासाठी थेट दिल्ली गाठली आहे. 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' कडे विक्री केलेल्या कांद्याचे तब्बल 200 कोटी रुपये थकल्याने, खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना साकडे घातले. केंद्र सरकारच्या 'किंमत स्थिरीकरण निधी' योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या नोडल एजन्सीजने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी केला होता. ही खरेदी प्रक्रिया 15 जून ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडली. नियमानुसार, खरेदीनंतर 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक होते. तशी घोषणाही सरकारने केली होती. मात्र, खरेदी होऊन आता सहा महिने उलटले तरी पैसे जमा झालेले नाहीत. तीन हजार शेतकऱ्यांची कोंडी या कालावधीत 3000 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला कांदा सरकारी एजन्सींना विकला. मात्र, 200 कोटींची रक्कम अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याबाबत स्थानिक पातळीवर दाद मागूनही उपयोग न झाल्याने शेतकऱ्यांनी खासदार भास्कर भगरे यांच्या माध्यमातून थेट दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. खासदार भगरे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत प्रशासनावर दबाव कायम ठेवला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UpAlSyL
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 200 कोटी नाफेडने थकवले:नाशिकचे शेतकरी थेट दिल्लीत शरद पवारांच्या दरबारी, केंद्रीय कृषीमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
December 09, 2025
0