राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. मात्र, केवळ या निकालांवर न थांबता त्यांनी आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे महापौर बसवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. तसेच, महायुतीमधील मित्रपक्षांकडून होणाऱ्या पदाधिकारी फोडाफोडीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत मुंबईत यावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. निकालांवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने मर्यादित जागा लढवल्या होत्या. तरीही आजच्या निकालावर मी आणि पक्षाचा कार्यकर्ता समाधानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी चांगले यश मिळाले असून, भाजप आणि शिवसेनेनेही (शिंदे गट) चांगली कामगिरी केली आहे. मात्र, आम्हाला अजून जमिनीवर काम करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी इंदापूर, भोर, फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल विशेष आभार मानले. मित्रपक्षांच्या 'फोडाफोडी'वर मुंबईत चर्चा महायुतीमध्ये काम करताना मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत असे ठरले होते, याकडे लक्ष वेधत अजित पवार म्हणाले, काही ठिकाणी मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घेतले आहेत. असे केल्याने मूळ पक्षातील उमेदवार नाराज होणार आणि ते दुसरी संधी शोधणार. या विषयावर मी मुंबईला गेल्यावर सविस्तर चर्चा करणार आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस टाळण्यासाठी हा मुद्दा गांभीर्याने घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र लढणार का? आगामी महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र लढणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्थानिक परिस्थितीचे महत्त्व अधोरेखित केले. आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, असे आम्हाला वाटते. भाजप आणि शिवसेनेलाही त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे, म्हणूनच काही ठिकाणी आम्ही एकमेकांविरोधात लढलो. शेवटी मतांची विभागणी झाली की निकाल फिरतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत तिथले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी आपल्या भाषणातून भविष्यातील हेतू स्पष्ट केला. राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आमचा महापौर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने आम्ही सध्या पुण्यात चाचपणी करत आहोत. कार्यकर्त्याला ताकद देऊन शहरांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SZ4D3RQ
29 महापालिकांत आमचाच महापौर हवा!:नगरपालिका निकालांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; महायुतीतील फोडाफोडीवर नाराजी व्यक्त
December 21, 2025
0