Type Here to Get Search Results !

प्रगतिशील शेतकरी:तब्बल 19 प्रकारच्या बांबू लागवडीतून एकरी साडेतीन लाखांचे उत्पन्न, धुळे येथील भोरखेडाच्या शेतकऱ्याचा प्रयोग

पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेवर मात करत धुळे जिल्ह्यातील भोरखेडा येथील शेतकरी शिवाजी राजपूत यांनी बांबू शेतीच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला. कधीकाळी केळी, भाजीपाला आणि कापसासारख्या पिकांमधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी बांबू शेतीचा धाडसी निर्णय घेतला. आज ५० एकर क्षेत्रावर त्यांनी बांबूचे साम्राज्य उभे केले आहे. सध्या ते एकरी साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. शिवाजी राजपूत यांची स्वतःची १४ एकर शेती असून त्यांनी २५ वर्षांच्या करारावर घेतलेल्या जमिनीसह एकूण ५० एकरांत बांबूची लागवड केली. त्यांनी विविध राज्यांतून बांबूच्या १९ जाती आणल्या. स्वतःच बियाण्यांपासून नर्सरी तयार केली आणि वर्षभर कष्ट करून रोपे तयार केली. आज त्यांच्या शेतात ४ ते ५ वर्षांचा बांबू आहे. बांबू विक्रीसोबतच राजपूत हे बांबूच्या पानांपासून ते 'लीफ मोल्ड' नावाचे ४० ते ५० रुपये किलोने विकले जाणारे ३० ते ३५ टन सेंद्रिय खत तयार होत आहे. 'बायोमास पॅलेट्स'ची निर्मिती बांबूच्या टाकाऊ भागापासून इंधनासाठी लागणारे 'बायोमास पॅलेट्स' आणि औषधी तसेच सौंदर्यप्रसाधनांसाठी उपयुक्त असलेला "कार्बोनायझेशन' पद्धतीचा कोळसाही ते तयार करत आहेत. बांबूची एकदा लागवड केल्यावर ४० वर्षांपर्यंत सतत उत्पादन मिळते. ५० एकर शेतीचे नियोजन केवळ १ ते २ माणसे करू शकतात. वादळ, अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा या पिकावर फारसा परिणाम होत नाही. एकरी १ लाख रुपये खर्चून लावलेला हा बांबू आता एकरी ३.५० लाखांचे उत्पन्न देऊ लागला आहे. बांबूपासून मिळणारे विविध उपपदार्थ केवळ बांबू विक्रीवर अवलंबून न राहता राजपूत यांनी बांबूच्या टाकाऊ भागापासून मूल्यवृद्धी केली आहे. यात बांबूच्या पानांपासून तयार होणारे मौल्यवान खत, कंपन्यांच्या बॉयलरसाठी लागणारे इंधन (बायोमास पॅलेट्स) आणि जमीन सुपीक करण्यासाठी तसेच पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जाणारा कार्बोनायझेशन पद्धतीचा कोळसा यांचा समावेश आहे. या उपपदार्थांमुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे. कमी कष्टात शाश्वत उत्पन्नाची हमी बांबू लागवडीनंतर पहिल्या दोन वर्षांनंतर मशागतीची अत्यल्प गरज भासते. राजपूत यांनी एका एकरात ३४० बांबूची बेटे लावली असून एका बेटापासून ३० ते ४० बांबू तयार होतात. दर १५ दिवसांनी पाणी देऊन त्यांनी ८ बोअरवेलच्या साहाय्याने ५० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. नैसर्गिक आपत्तींमध्येही तग धरण्याची क्षमता हे या पिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4Y0Ebkz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.