Type Here to Get Search Results !

राज्यात रस्ते अपघातांचा थरार:चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत, घटनेने अमरावती हादरले

राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांनी अमरावती आणि नाशिक जिल्हा हादरला आहे. अमरावतीच्या चिखलदरा घाटात गाडी वाचवण्याच्या नादात चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून मृत्यू झाला, तर इकडे सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा घाटात एक मनाला चटका लावणारी घटना घडली. पर्यटकांनी भरलेली एक ट्रॅव्हलर बस घाटातून जात असताना, एका प्रवाशाला मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने गाडी एका उतारावर थांबवण्यात आली. सर्व प्रवासी खाली उतरले असतानाच, उतारावर उभी असलेली बस अचानक दरीच्या दिशेने सरकू लागली. हे पाहताच, बस दरीत कोसळू नये यासाठी चालकाने जिवाची बाजी लावत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगात असलेल्या बसखाली चालकच चिरडला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. त्याला मदत करण्यासाठी धावलेले इतर दोन प्रवासीही यात जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. लग्नासाठी आले, पण काळाने गाठले दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात समृद्धी महामार्गावर घडली. कल्याणवरून सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे लग्नासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. दोन खाजगी बस आणि एका 'किया करेन्स' कारमधून हे वऱ्हाड प्रवास करत होते. कारमध्ये 3 प्रौढ आणि 8 लहान मुले असे एकूण 11 जण होते. गाडी वेगात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटून एका ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एक पुरुष आणि एक महिला यांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक असल्याने वातावरण शोकाकुल झाले आहे. दुपारी 1 वाजता हा अपघात घडला, मात्र अपघातग्रस्त वाहनांच्या ताफ्यातील खाजगी बस तब्बल 4 वाजेपर्यंत घटनास्थळी किंवा रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सिन्नर पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/96tVRXU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.