अमरावती जिल्ह्यात शेतीपिकांची स्थिती दर्शवणारी अंतिम पैसेवारी बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७ असून, ती ५० पेक्षा कमी असल्याने प्रशासनाने दुष्काळसदृश स्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी शेतीपिकांचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालानुसार, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील २००४ पैकी शेतीपिकांची लागवड झालेल्या १९७३ गावांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १९७३ पैकी १९३९ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती असामान्य आढळली. गतकाळातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सततच्या पावसामुळे या गावांमध्ये शेतीपिकांची उत्पादकता घटली आहे. केवळ ३४ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती समाधानकारक असल्याने तेथील पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. या अहवालानुसार, धारणी तालुक्यातील १५२ पैकी केवळ ३४ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती बरी आहे. धारणी तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित १३ तालुक्यांमधील सर्व लागवडयोग्य गावांमध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय पैसेवारी पाहता, तिवसा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ४३ आहे. मेळघाटातील धारणी, चिखलदरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांची पैसेवारी सर्वाधिक ४९ आहे. वरुड, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात ४८, तर भातकुली, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यांची पैसेवारी ४७ आहे. अमरावती आणि अचलपूर तालुक्याची पैसेवारी ४६ वर थांबली आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५६ वर स्थिरावली होती. त्यावेळी चांदूर बाजार आणि वरुड तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक ६१ होती, तर धारणी तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ५२ होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jzoNKMl
अमरावती जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीवर शिक्कामोर्तब:अंतिम पैसेवारी 47 जाहीर, 1939 गावांमध्ये 50 पेक्षा कमी
December 31, 2025
0