Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदेंनी टीका करताना लाज बाळगायला हवी:हे विषारी साप आता 'ॲनाकोंडा'ला चावायला निघालेत, आदित्य ठाकरेंचा बोचरा वार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या 'हिंदुत्व' आणि 'भ्रष्टाचारा'च्या वादात उडी घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. "ज्यांनी तुम्हाला पहिले आमदार केले, मंत्री केले, त्यांच्यावर टीका करताना थोडी तरी लाज बाळगायला हवी होती. हे विषारी साप आता थेट ॲनाकोंडाला चावायला निघाले आहेत," अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर देताना, "मला हिंदुत्व शिकवण्यासाठी भाजप किंवा संघाची गरज नाही," असे ठणकावले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत, "ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, मुंबई लुटली आणि आरोग्यसेवेची दुर्दशा केली, त्यांनी अमित शहांवर बोलू नये," असा टोला लगावला होता. वडिलांवर झालेल्या या टीकेमुळे संतापलेल्या आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना त्यांच्या राजकीय कारकीर्दीची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केला. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंनी अमित शाहांच्या बाजुने खिंड लढवत त्यांना लक्ष्य केले. आपल्या वडिलांवर केलेली टीका सहन न झाल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी, यांना पहिले आमदार मंत्री कोणी केले? असा सवाल करत, आता हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघाले आहेत, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. पागडी इमारतींचा निर्णय 'बिल्डरधार्जिणा' पागडी आणि सेस इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेवरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मंत्र्यांना आपले खाते कळत नाही, हे निर्णय केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी घेतले जात आहेत. या निर्णयांची जबाबदारी नेमकी कुणाची, म्हाडाची की पालिकेची? हे स्पष्ट नाही. हे सरकार नेहमीच घाईघाईत निर्णय घेते," अशी टीका आदित्य यांनी केली. भाडेकरूंना केवळ त्यांच्या ताब्यातील क्षेत्राइतकाच एफएसआय मिळणार असल्याने हा निर्णय रहिवाशांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सूचित केले. ...म्हणून बिबटे वस्तीत शिरत आहेत राज्यात बिबट्यांच्या शहरी भागातील नागरिकांवर वाढत्या हल्ल्यांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. "भाजप सरकार मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करत आहे, त्यामुळेच बिबटे नागरी वस्तीत शिरत आहेत. हे मंत्रिमंडळ फक्त विकासक आणि व्यापाऱ्यांचे आहे, त्यांना पर्यावरणाशी काहीही देणेघेणे नाही," असे ते म्हणाले. तसेच पुण्यातील मुंढवा प्रकरणावर उद्या आपण सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AhVvJeF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.