Type Here to Get Search Results !

मतांसाठी काहीही!:अमित साटम यांनी स्वतः 'बूट पॉलिश' करत वेधले लक्ष; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज

निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना जनतेच्या चरणी लीन होताना आपण पाहतोच, पण मुंबईत भाजप आमदार अमित साटम यांनी तर थेट 'पायालाच' हात घातला आहे. सोमवारी साटम यांनी चक्क बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या जागी बसून त्यांचे बूट पॉलिश केले. नेत्याचा हा 'बूट पॉलिश' अवतार सध्या मुंबईत चांगलाच चर्चेचा आणि तितकाच उपरोधाचा विषय ठरत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या प्रचाराची रणनीती आक्रमक केली असून, तळागाळातील कष्टकरी वर्गाला साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज दादर येथे आयोजित रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी साटम यांनी केवळ भाषण न करता, स्वतः बूट पॉलिश करून कामगारांच्या श्रमांप्रती आदर व्यक्त केला. या अनोख्या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रेल्वे स्थानकांवर रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बूट पॉलिश कामगारांच्या मेळाव्यात अमित साटम यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या या कष्टकरी वर्गाच्या आरोग्याच्या समस्या, हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. कामगारांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता ठोस कृतीतून ते सोडवण्याचा विश्वास साटम यांनी दिला. तिकिटाची वाट पाहू नका, कामाला लागा मेळाव्यानंतर भाजपच्या निवडणूक संचलन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. कोणाला तिकीट मिळेल किंवा उमेदवार कोण असेल याची वाट बघत बसू नका, आता थेट कामाला लागा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईत पक्षाचा 'घरोघरी प्रचार' सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. 27 समित्यांकडे प्रचाराची धुरा निवडणुकीचे नियोजन अत्यंत सूक्ष्म स्तरावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. प्रचाराचे नियोजन, सभांचे आयोजन आणि रणनीती ठरवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक प्रभागात पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6pYqlzG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.