Type Here to Get Search Results !

भंडाऱ्याच्या सोरना जि.प. शाळेत विद्यार्थी ‘एआर-व्हीआर’ ने अनुभवताहेत शिक्षण:शाळेमध्ये हौशीने येतात मुले

एआयसह ऑगमेंटेड रिॲलिटी -व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (एआर-व्हीआर) तंत्रज्ञानातून मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याच्या पद्धतीमुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत काॅन्व्हेंटमधून मुले परत आली. अवघी १९ मुले असलेल्या सोरना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता ४५ मुले शिकत असल्याची माहिती “४-डी’ चे सहायक शिक्षक कैलास चव्हाण यांनी दिली. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग चालतात. दोन वर्ग खोल्या आणि कैलास चव्हाण यांच्यासह दोन शिक्षक आहेत. शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी भरते. शाळा संपते तिथून जंगल सुरू होते. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकणे रंजक व्हावे व प्राण्यांसह विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख सहजपणे व्हावी म्हणून चव्हाण यांनी एआयसह एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग करीत व्हिडिओ तयार केले. चव्हाण ह्यांनी ह्यापूर्वी सुद्धा अध्ययन व अध्यापनात तंत्रज्ञान वापरुन अनेक प्रयोग केले आहे. त्यांच्या तंत्रज्ञानातील प्रयोगाची दखल घेत दिल्ली येथील शैक्षणिक संस्था “निपा’ने त्यांच्या ४-डी क्लासवर माहितीपट तयार करून त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. ‘एज्युटेक’ यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ चव्हाण यांचे “एज्युटेक’ नावाने यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर ते सर्व व्हिडिओ अपलाेड करतात. २०१८ पासून उपक्रम सुरू केला. तेव्हा पटसंख्या १९ होती. आता ४५ आहे. २०१९ मध्ये एकाच वेळी १६ मुले काॅन्व्हेेंटमधून आली. गावापासून अर्धा ते पाऊण किमी दूर शाळा असूनही मुले हौशीने नियमितपणे शाळेत हजेरी लावतात. विद्यार्थ्यांना अंतराळ सफरीची आभासी मजा यात विद्यार्थी जंगलात प्राण्यासोबत खेळतात, त्यांच्यावर बसून जंगल सफारी करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, चंद्रावर माणूस कशाप्रकारे चालेल याचा अनुभव घेतात. काही विद्यार्थी आकाशात उडताना अंतरीक्ष सफर करतात. दिवसभर आटापिटा करूनही न कळणारी एखादी गोष्ट मुलांना आता एका क्षणात समजते. -कैलास चव्हाण, तंत्रज्ञानस्नेही शिक्षक पाठ्यपुस्तकांचे ॲनिमेशन, सुलभ झाले शिक्षण पाठ्यपुस्तके ॲनिमेट करण्यासाठी चव्हाण आधीच एआर टूल्स वापरत आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये एआर/व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर सोप्या संकल्पनांसह सखोल परिणाम करतो. यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढली. मुलांच्या विकासावर, शिकण्याच्या शैलीवर आणि भविष्यातील तयारीवर त्याचा प्रभाव पडतो. तंत्रज्ञानामुळे वेगाने विकसित होत असलेल्या जगात मुले स्वत:ची जागा शोधण्यास सक्षम होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शिक्षणात व्हीआर-एआर तंत्रज्ञानाचा असा वापर व्हीआर उपकरणांमुळे विद्यार्थी कृत्रिम जगाभोवती पाहू शकतात, त्यात फिरू शकतात आणि आभासी वैशिष्ट्ये किंवा वस्तूंशी संवाद साधू शकतात. हा प्रभाव सामान्यतः व्हीआर हेडसेटद्वारे तयार केला जातो. तर एआर म्हणजे ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ तंत्रज्ञान आभासी जगामध्ये पूर्णपणे न जाता वास्तविक अनुभवात डिजिटल घटक मिसळते. शिक्षणामध्ये स्मार्टफोन, टॅबलेट किंवा एआर चष्मा यांसारख्या उपकरणांद्वारे वास्तविक जगावर प्रतिमा, मजकूर, ध्वनी आणि ॲनिमेशन यांसारख्या डिजिटल मीडियाचा अनुभव विद्यार्थी घेतात.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/f7QhxLN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.