मुंबई मनपा निवडणुकीच्या निकालानंतर ‘नॉट रिचेबल’झाल्यामुळे चर्चेत आलेल्या प्रभाग १५७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के २४ तासांनंतर अखेर गुरुवारी समोर आल्या आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण ठाकरे गटातच असल्याचा पुनरुच्चार केला. गेल्या दोन दिवसांपासून त्या शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. तुळजापूरला नवस फेडण्यासाठी गेले होते: डॉ. म्हस्के म्हणाल्या, “निवडणुकीपूर्वी मी विजयाचा नवस बोलले होते. तो फेडण्यासाठीच मी तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. मी कुणाच्याही संपर्कात नव्हते किंवा फुटणार नव्हते. कोकण भवनला गटनोंदणीसाठी येण्याचा मेसेज मला उशिरा मिळाला, तोपर्यंत मी मुंबईबाहेर निघाले होते.’ नॉट रिचेबल असण्याबाबत त्यांनी खुलासा केला. “विरोधक आमच्या मागावर असतात. आम्हाला ट्रेस केले जाऊ शकते अशी भीती होती. त्यामुळे ‘तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत फोन बंद ठेवा,’असे आदेश आम्हाला वरिष्ठांकडून देण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि ट्रॅकिंग टाळण्यासाठीच मी फोन बंद केला होता,’ असे त्यांनी सांगितले. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जाऊन कोकण भवन येथे अधिकृत गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. मी तीन वर्षे शिंदे गटात काम केले होते, पण युतीमध्ये ती जागा भाजपकडे गेल्याने मला डावलले गेल्याचेही त्यांनी या वैळी सांगितले. कोण आहेत सरिता म्हस्के? डॉ. म्हस्के यांनी १८०३ मतांसह भाजपच्या आशा तायडेंवर विजय मिळवला. म्हस्के यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा ४०० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजप व्हाया शिंदेसेनेत प्रवेश केला. आता उबाठात त्या नगरसेविका आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Ds3SkEI
‘नॉट रिचेबल’ डॉ. सरिता म्हस्के 24 तासांनंतर ‘मातोश्री’वर झाल्या दाखल:विरोधकांपासून वाचण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानेच फोन बंद ठेवल्याचा दावा
January 22, 2026
0