Type Here to Get Search Results !

विकासाची चारचाकी आणि भाजपचा चालक!:चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पेठेत हटके फटकेबाजी

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पेठ येथे आयोजित समाज मेळाव्यात भाषण केले. यावेळी त्यांनी विकासाची तुलना चारचाकी गाडीशी करत नागरिकांना योग्य 'चालक' निवडण्याचे आवाहन केले. बावनकुळे म्हणाले की, विकासाची चारचाकी गाडी पुणे महापालिकेच्या कार्यालयासमोर उभी आहे. या गाडीचे एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचे, दुसरे चाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनांचे, तिसरे चाक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या योजनांचे, तर चौथे चाक आमदार हेमंत रासने यांच्या योजनांचे आहे. या गाडीचा चालक कमळावर निवडून आलेला कार्यकर्ता किंवा कार्यकर्तीच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या विकासाच्या गाडीला इंधन देण्याचे काम आपण स्वतः, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार मुरलीधर मोहोळ करणार असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. हा मेळावा प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) मधील भाजप-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युतीचे अधिकृत उमेदवार पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, विशाल धनवडे आणि ऋतुजा गडाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राजेंद्र काकडे आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, ही निवडणूक केवळ व्यक्तींच्या नशिबाची नसून, विकासाच्या योजनांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ५५, राज्य सरकारच्या ४८ आणि जिल्हा नियोजन समितीच्या २२ अशा एकूण १२६ योजना प्रभागात आणण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपचे उमेदवार विजयी झाल्यास पुणेकरांना मेट्रो जाळे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, २४ तास पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, नदीपात्र सौंदर्यीकरण आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करून विकसित पुण्याचा संकल्प साकार करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी पुणेकरांना केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QLntqDS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.