Type Here to Get Search Results !

इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे सोयीचे राजकारण!:हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील 'घड्याळ' चिन्हावर लढणार, बुधवारी अर्जही दाखल करणार

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रित रणनीती आखली असून, मतदारसंघाच्या सोयीनुसार 'घड्याळ' किंवा 'तुतारी' या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटप आणि चिन्हांच्या तडजोडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातही याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. या नव्या सूत्रानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या इंदापूर तालुक्यातील 'बावडा' जिल्हा परिषद गटामधून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या नेत्याची कन्या असूनही अंकिता पाटील या 'घड्याळ' चिन्हावर आपली निवडणूक लढवणार आहेत. त्या बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून इंदापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. श्रीराज भरणे हे बुधवारी 'बोरी' पंचायत समिती गणासाठी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवेशामुळे भरणे कुटुंबाचा वारसा आता नव्या पिढीकडे सोपवला जात असल्याची चर्चा असून, इंदापूरच्या स्थानिक राजकारणात या युवा नेतृत्वाच्या एन्ट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी 'सोयीनुसार चिन्ह' वापरण्याची विशेष रणनीती आखली असून, पुणे जिल्ह्यासह राज्यभरात 'घड्याळ' आणि 'तुतारी' या दोन्ही चिन्हांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतर दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकत्र येत ही नवी रणनीती निश्चित केली असून, ज्या मतदारसंघात जे चिन्ह विजयासाठी अधिक फायदेशीर ठरेल, तिथे त्याच चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जाईल. राष्ट्रवादीच्या या 'चिन्ह समन्वया'च्या प्रयोगामुळे स्थानिक राजकारणात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली होती. तरी देखील भाजप पक्ष या दोन्ही ठिकाणी वरचढ ठरल्याचे दिसून आले आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला. आता पुढील निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6478a9Y

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.