Type Here to Get Search Results !

सुनेत्रांची शपथ, पवारांची घालमेल:शरद पवार, सुप्रिया सुळे शपथविधीला गैरहजर; अर्थ खाते सुनेत्रा पवारांकडे नाही

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आणि १७ व्या उपमुख्यमंत्रिपदाची सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली. त्यानंतर तासाभराने खातेवाटप जाहीर झाले. त्यानुसार अजित पवारांकडे असलेले सर्वात शक्तिशाली अर्थ खाते आता सुनेत्रा पवारांकडे राहणार नाही. हे खाते फडणवीसांनी तूर्तास स्वत:कडेच ठेवले आहे. तेच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करतील. सुनेत्रा यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याची धुरा देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी शरद पवारांनी जवळपास तीन महिन्यांनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुनेत्रा यांच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहिती नाही, मला काही सांगितलेलेच नाही, अशा शब्दांत जाहीर नाराजी व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची अजित पवारांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यानंतर बारामती येथेच थांबलेल्या पार्थ यांनी शरद पवारांची तर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेतली. विलीनीकरणाविषयी अजित पवारांचा आम्हाला कोणताही आदेश नव्हता, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. इनसाइड स्टोरी; पडद्यामागून प्रचंड वेगाने सूत्रे हलवत अदृश्य शक्तीने शक्य केले सर्वकाही अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर सक्रिय झालेले शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून त्याचा पूर्ण ताबा घेऊ पाहत आहेत, त्यांना थोडासाही वेळ मिळाला तर ते अजित पवार गटात फोडाफोडी करून राज्यातील राजकीय समीकरण ढळवू शकतात, असे शुक्रवारी दुपारी दिसू लागले होते. साडेतीन वर्षांपूर्वी शरद पवारांनी भाजपशी सत्तेची बोलणी केली होती. त्यानुसार अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीसाठी पाठवले आणि नंतर भाजपची विचारधारा मला अजिबात मान्य नाही, असे म्हणत माघार घेतली होती. ७२ तासांतच भाजपवर तोंडघशी पडण्याची वेळ आली होती. आता तर अजित पवार नव्हते. त्यामुळे शरद पवार काहीही खेळी करू शकतात, असे वाटल्याने अदृश्य शक्तीने पडद्याआडून अतिशय वेगाने सूत्रे हलवली. त्यानुसार आधी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल दोन सत्रांत मुख्यमंत्र्यांना भेटले. या दोघांनीही सुनेत्रा पवारांची निवड निश्चित नाही, असे सांगत शरद पवार गोटाला संभ्रमात टाकले. त्याच वेळी अदृश्य शक्तीने राजकीय व्यक्तीपेक्षा दिवंगत अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांमार्फत उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवारांना राजी केले. मात्र, शपथविधीपूर्वी त्या कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांना भेटू नयेत, म्हणून त्यांना, जय पवारांना पोलिस ताफ्यासह थेट मुंबईत देवगिरी बंगल्यावर आणले. काही गडबड झालीच तर ती निपटण्यासाठी पार्थना बारामतीतच ठेवत मुंबईत शपथविधीची तयारी केली. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया... आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतिची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” दर ५ मिनिटांनी १०० फॉलोअर्स वाढले सुनेत्रा यांच्या शपथविधीनंतर प्रोफाइलमध्ये उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र असे अपडेट करण्यात आले. दरम्यान, शपथविधीनंतर शनिवारी ९ वाजेनंतर प्रत्येक पाच मिनिटांनी शंभर फॉलोअर्सची वाढ होत होती. चार दिवसांपूर्वी १६,६६१ फॉलोअर्स हाेते. आता ही संख्या २२ हजारांपेक्षा जास्त झाली. सुनेत्रा पवारांच्या माहीत नसलेल्या १० गाेष्टी... 1. फर्स्ट डे फर्स्ट शाे... छत्रपती संभाजीनगर येथील स.भु. कॉलेजमध्ये असताना बघितला प्रत्येक चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो. अमिताभ बच्चन आणि रेखा आवडते स्टार,तर दोस्ताना आवडता चित्रपट 2. चित्रकलेची आवड... पेंटिंग करत हाेत्या, जहांगीर आर्ट गॅलरीत भरवले होते प्रदर्शन. 3. साधेपणा... भाऊ मंत्री तरी साधी राहणी, होस्टेलची रूम स्वत:च झाडत होत्या. कपडेही स्वत:धुवायच्या. 4. दादांना आवडायचे त्यांच्या हातचे काळे मटण... शाकाहारी खायचे असल्यास स्वत: बनवायच्या चविष्ट खिचडी. 5. खादी, काॅटन साड्यांची आवड... कपाटात पैठणी, सिल्कचा स्टॉक पण पसंती कॉटन किंवा खादीच्या साध्या साडीला. 6. शांत स्वभाव... तीन वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण घेतले. कुणाशीही भांडण नाही, प्राचार्यांकडे कुणाचीही तक्रार नाही. 7. खर्च वाटून घ्यायच्या... आता सुनेत्रांची संपत्ती ७० कोटी. अजित दादांच्या ५० कोटींपेक्षा जास्त. मात्र कॉलेजमध्ये असताना सर्व खर्च घ्यायच्या वाटून. भावाने पाठवलेल्या पैशातच भागवायच्या खर्च. 8. नाटकाची आवड... कॉलेजमध्ये असताना पाहायच्या अनेक नाटकं. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक पसंतीचे. अनेकदा पाहिले. 9. पायी फिरणे... घरी श्रीमंती असतानाही महाविद्यालयात कधीही कारचा वापर केला नाही. कायम पायी आणि रिक्षाने केला प्रवास. 10. पुरणपाेळीपुढे सगळे फिके ... पुरणपोळी आणि गव्हाची खीर आवडीचा पदार्थ, मेसचे जेवण आवडले नाही तर मैत्रिणीकडून मागवायच्या डबा. 11. १ किलाे साेने, ३५ किलाे चांदी, २८ कॅरेट हिऱ्यांच्या दागिन्यांची मालकीण, पण अंगावर घालण्याची हाैस नाही... (गीता खांबेकर, सुजाता सूर्यवंशी-बिटके, अनुराधा देशमुख, विद्या लाेळगे, प्राचार्य जीवन देसाई, माेहन फुले, ॲड. रामेश्वर ताेतला.. यांनी सांगिलेल्या आठवणीतून...) संकलन : महेश जोशी, प्रवीण ब्रह्मपूरकर

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CZcvOqA

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.