लष्कर भागातील पूना क्लबच्या एका संचालिकेला पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव आणून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि शहरातील पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी अली दारुवाला यांच्यासह तिघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४७ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पूना क्लबच्या संचालक असून, त्या शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी महिला क्लबमधील जलतरण तलावाजवळील पार्किंगमधून मोटार घेऊन घरी निघाल्या होत्या. त्यावेळी दारुवाला हे त्यांच्या दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी महिलेच्या मोटारीजवळ आपली मोटार लावली आणि गोल्व्हा नावाच्या व्यक्तीसोबत झालेला पेट्रोलपंपाचा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. सुरुवातीला हा गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तो कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी दिली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. या आरोपांवर अली दारुवाला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'तक्रारदार महिलेशी माझा कोणताही वाद नाही. मी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पदाधिकारी असल्याने त्यांना व्यवहार पूर्ण करण्यास सांगत होतो. मी त्या व्यवहारात मध्यस्थ होतो. आमच्यातील वाद मिटला आहे,' असे सांगत दारुवाला यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9FmtnMB
पूना क्लब संचालकांना धमकावले:पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव; भाजप प्रवक्त्यावर गुन्हा
February 06, 2026
0