Type Here to Get Search Results !

एजंटगिरी ते ‘कॅप्टन’चा दरबार; 210 फुटांच्या गाळ्यातून करायचा भोंदूगिरी:सामान्यांना दर्शनासाठी दीड वर्ष ताटकळावे लागायचे

कॅनडा कॉर्नरच्या एका अरुंद बोळीत १० बाय १२ च्या छोट्याशा खोलीत बसून लोकांचे भविष्य बदलण्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा प्रवास थक्क करणारा आहे. १९९८ मध्ये जमिनीचा व्यवहार करणारा एक सामान्य एजंट ते कोट्यवधींचे साम्राज्य उभा करणारा ‘कॅप्टन’ ज्योतिषी... असा त्याच्या भोंदूगिरीचा प्रवास आता चव्हाट्यावर आला आहे. जिथे सामान्य माणसाला दर्शनासाठी दीड-दीड वर्ष ताटकळावे लागायचे तिथे बड्या नेत्यांना मात्र अवघ्या आठ दिवसांत ‘तारीख’ मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने १९९८ मध्ये एका छोट्या गाळ्यातून रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला होता. जमिनीच्या व्यवहारातून लोकांच्या संपर्कात येत असतानाच त्याने हळूहळू भविष्य सांगण्यास सुरुवात केली. २००४ नंतर त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली आणि जमिनीच्या व्यवहाराची जागा पूर्णपणे भोंदूगिरीने घेतली. २०१४ नंतर त्याने स्वतःचे स्वतंत्र साम्राज्य विस्तारले. १० बाय १२ च्या या कार्यालयाच्या अर्ध्या जागेत झेड ब्लॅक काचा लावून ‘कॅप्टन’चा दरबार भरू लागला. सुज्ञ सल्ल्याने वाचला एका तरुणाचा संसार एका तरुणाने नवीन व्यवसाय सुरू केला, पण तीन वर्षांतच त्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. नैराश्यातून मार्ग काढण्यासाठी तो आपल्या पत्नीसह खरातकडे गेला तेव्हा खरातने त्याला दीड लाखाचे रत्न खरेदी करून पूजा करण्याचा महागडा सल्ला दिला. मात्र, या तरुणाच्या ओळखीच्या एका सुज्ञ व्यावसायिकाने त्याला मोलाचा सल्ला दिला की, ‘हाताच्या रेषांपेक्षा मनगटावर (कर्तृत्वावर) विश्वास ठेव, या भोंदूच्या नादी लागू नकोस.’ त्या तरुणाने भोंदू खरातकडे जाणे टाळले आणि मेहनत सुरू ठेवली. आज खरातचे खरे रूप समोर आल्यावर योग्य सल्ल्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला. बड्या हस्तींसाठी अंथरायचा रेड कार्पेट खरातच्या दरबारात भक्तीपेक्षा शक्ती आणि संपत्तीला झुकते माप दिले जात असे. नाशिकसह राज्यातील बडे राजकीय नेते, धनदांडगे व्यापारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना येथे विशेष वागणूक मिळे. व्हीआयपी कल्चर : बड्या नेत्यांना अवघ्या ८ दिवसांत भेटीची वेळ मिळे. अनेक दिग्गज नेते सकाळी ८ वाजेपासूनच रांगेत उभे राहत. सामान्यांची परवड : आपल्या व्यथा घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र भेटीसाठी तब्बल दीड ते दोन वर्षांचे वेटिंग दिली जाई. दरबाराची वेळ : कोरोनाकाळानंतर हा दरबार केवळ शनिवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत भरत असे. या वेळी कार्यालयाबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागत. झेड ब्लॅक काचांच्या आडून ‘काळी’ कृत्ये खरातच्या कार्यालयाला असलेल्या झेड ब्लॅक काचांमुळे आत नेमके काय चालते याची पुसटशी कल्पनाही बाहेर बसलेल्यांना येत नसे. या गोपनीयतेचा गैरफायदा घेत खरात लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना भविष्याची भीती दाखवत असे. २०२१ नंतर या दरबाराचे स्वरूप अधिक भव्य झाले आणि येथून तो कारनामे करायचा.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6l0mhjo

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.