Type Here to Get Search Results !

मोझरी शेतशिवारात आग, गव्हाचे पीक जळून खाक:महावितरणच्या चुकीमुळे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप

तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतशिवारात दुपारी अचानक आग लागल्याने दोन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सुधीर होले यांनी महावितरणच्या चुकीमुळे आग लागल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास वाकलेल्या विद्युत खांबामधून ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली. आगीची माहिती मिळताच शेतकरी सुधीर होले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, कोरडे वातावरण, वाऱ्याचा वेग आणि पिकाची स्थिती यामुळे आग झपाट्याने पसरली. परिणामी, दोन एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक पूर्णतः नष्ट झाले. घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाकडून पंचनामाही करण्यात आला असून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. शेतकरी सुधीर होले यांनी या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने, संबंधित शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाकलेले आणि धोकादायक विद्युत खांब तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fxUF76N

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.