नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हसला हे छोटेसे गाव आता राष्ट्रीय स्तरावर चमकले आहे. या गावातील सरपंच हेमंत ढेपे आणि पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड यांचा दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'हर घर नल से जल' अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सध्या मांजरी म्हसला गावातील ६३० घरांना दररोज पाणी मिळते. येत्या आठवडाभरात सुमारे ४२०० नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची तयारी गावाने केली आहे. नागरीकरणामुळे अनेक शहरांना रोज पाणी मिळणे कठीण असताना, या छोट्याशा गावाने पाणी व्यवस्थापनात आदर्श निर्माण केला आहे. केंद्र शासनाच्या 'हर घर नल से जल' अभियानांतर्गत राष्ट्रीय जल जीवन मिशनतर्फे देशभरात 'जल महोत्सव पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रीय जल महोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ढेपे आणि राठोड यांना उत्कृष्ट कार्यासाठी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रमाणपत्रामुळे मांजरी म्हसला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. जल महोत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ दहा जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्याची निवड झाली होती, ज्यात मांजरी म्हसला ग्रामपंचायतीची "नल जल मित्र" या विशेष वर्गवारीतून निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील शाश्वत व कार्यक्षम पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींशिवाय केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, राज्यमंत्री वी. सोमन्ना, राजभूषण चौधरी यांच्यासह केंद्र सरकारचे विविध मान्यवर मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड यांनी गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, पाइपलाइनची नियमित तपासणी करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे अशा कामांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक बाळासाहेब रायबोले, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे, गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, ग्रामपंचायत अधिकारी रोहित तायडे तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8ukPmIK
मांजरी म्हसला गावाला 24 तास पाणीपुरवठा:630 घरांना मिळणार सुविधा, सरपंच-कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
March 15, 2026
0