Type Here to Get Search Results !

घटस्फोटासाठी आलेले दाम्पत्य पुन्हा एकत्र:अमरावती लोकअदालतीत समुपदेशनाने वाचला संसार

अमरावती येथील लोकअदालतीत घटस्फोटासाठी आलेले एक दाम्पत्य समुपदेशनानंतर पुन्हा एकत्र परतले. त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांनी सहजीवनाचा मार्ग पुन्हा स्वीकारला, ज्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. शनिवारी येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत आपसी संमतीने घटस्फोटासाठी दाखल झालेले ग्रामीण भागातील एका पती-पत्नीचे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास काही काळापूर्वी सुरू झाला होता. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शेळके यांच्यासमोर हे प्रकरण ठेवण्यात आले होते. सुरुवातीला दोघांनीही आपसी संमतीने घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, कौटुंबिक न्यायालयाचे समन्वयक, न्यायाधीश आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी हे कुटुंब तुटू नये यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी पती-पत्नी दोघांचीही योग्य समजूत घातली. भविष्यातील दुष्परिणाम, विशेषतः त्यांच्या मुलांवर होणारे परिणाम याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. या समुपदेशनामुळे दोघांनीही आपली घटस्फोटाची मागणी मागे घेतली. त्यांनी काही कारणास्तव रखडलेला सहजीवनाचा मार्ग पुन्हा एकदा स्वीकारला. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् समोर त्यांनी स्वतःच ही बाब स्पष्ट केली. या निर्णयानंतर दाम्पत्याने सांगितले की, "आम्ही आमच्या लहान मुलाचा आणि आमच्या संसाराचा विचार करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला आहे." मागील तीन महिन्यांपासून ॲड. चंद्रशेखर डोरले, ॲड. सुयश डोरले, ॲड. प्रथमेश गणेशकर आणि ॲड. निसार खान या वकिलांनी दिलेले सल्ले त्यांना पटले असल्याचे त्यांनी नमूद केले. अशाप्रकारे, संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेला त्यांचा संसार लोकअदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4GjRXhz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.