एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने बुधवारी, १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त कार्यालयांवर मोर्चा काढला. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि कुटुंबाला सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघातात गजानन श्रीराम माकोडे (वय ५२) आणि त्यांची मुलगी सपना (वय २४) यांचा मृत्यू झाला. गजानन माकोडे हे सपनाला पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल पॉईंटवर सोडायला जात होते. त्यांच्यासोबत त्यांची दुसरी मुलगी प्रियंकाही होती. एमआयडीसी परिसरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या एका टोळक्याने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका गंभीर जखमी झाली. तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, सध्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारमधील सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. ही संपूर्ण माहिती आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांसमोर मांडली. गजानन माकोडे हे चिकन विक्रीचा किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. नुकतीच सपनाला पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. कुटुंबाचा आधार असलेल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने, सर्व आरोपींना त्वरित अटक करावी आणि शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी समितीने केली. या आंदोलनात समितीचे अध्यक्ष सुधीर लसणकर, सचिव राजाभाऊ लोयटे, उपाध्यक्ष अशोकराव पारडे, सुरेशराव वानखडे, कोषाध्यक्ष गणेशराव नेहर, सहसचिव मनोहर सदाफळे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम नेहर (जिल्हा परिषदेचे माजी सभापती), नंदूभाऊ हरणे (माजी नगरसेवक) आणि निर्मलाताई पारधे यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले होते. पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी समितीचे प्रतिनिधीमंडळ त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते. मात्र, पोलिस आयुक्त राकेश ओला हे नियमित तपासणीसाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात उपस्थित असल्याने, प्रतिनिधीमंडळाने आपला मोर्चा तिकडे वळवला. सिटी कोतवाली येथे आयुक्तांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आधीच दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0ctjow7
खाटीक समाजाचा सीपी, कलेक्ट्रेटवर मोर्चा:अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय; दोषींवर कारवाईची मागणी
March 18, 2026
0