माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणावरून मंगळवारी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. “अजितदादांच्या मृत्यूबाबत संशयाचा धूर येत असताना सरकार चर्चा का टाळत आहे?’, असा जळजळीत सवाल करत विरोधी आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे ही चर्चा लांबणीवर पडली आहे. येत्या सोमवारी (किंवा बुधवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर विशेष चर्चा घेतली जाईल, असे आश्वासन सभापती राम शिंदे यांनी दिल्यानंतर वातावरणातील तणाव निवळला. २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक साशंकता असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या तपासाबाबत सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी यासाठी विधान परिषदेत चर्चा करावी. त्याबाबत सरकारने निवेदन करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आमदार शशिकांत शिंदे यांनी केली होती. सभापती राम शिंदे यांनीही त्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला, तरी चर्चा होत नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. सातत्याने तारीख पे तारीख दिली जाते. महाराष्ट्राला या मृत्यूबाबत उत्तर हवे आहे, असा मुद्दा अमोल मिटकरी यांनी मांडला. कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या मुद्द्याला समर्थन देत, महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा असा मृत्यू होणे, हा कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला. तर शशिकांत शिंदे यांनी सत्य बाहेर येऊ नये म्हणून चर्चा टाळली जात आहे का, असा सवाल केला. आमदार सचिन अहिर यांनी केवळ शोक प्रस्ताव पुरेसा नाही तर सखोल चर्चा केल्यास चौकशीची दिशा स्पष्ट होईल, असे म्हटले. आमदार संतापल्याने गोंधळ निर्माण झाला. सभापतींच्या निवेदनातून कोणत्या दिशेने तपास सरकला याची स्पष्टता येईल अजितदादांच्या विमान अपघाताला दीड महिना उलटला तरी तपासाबाबत अद्याप गूढ कायम आहे. या प्रकरणाची केंद्राकडून समांतर चौकशी सुरू असतानाच, आता राज्य सरकारच्या तपासाचा ‘स्टेटस रिपोर्ट’ काय आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. म्हणूनच, विधान परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे आगामी निवेदन अत्यंत महत्वाचे आहे. या निवेदनातून तांत्रिक बिघाड, घातपात की मानवी चूक, यापैकी नेमक्या कोणत्या दिशेने तपास सरकला आहे, याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. चर्चेसाठी रोहित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट दरम्यान, राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची विनंती करणारे एक निवेदन त्यांनी नार्वेकर यांना दिले. या मुद्यावर विधिमंडळात साधी चर्चाही न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण नार्वेकरांना भेटून विनंती केली, असे रोहित म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MDTughd
अजित पवारांच्या मृत्युप्रकरणी सरकार चर्चा का टाळतेय, विरोधकांचा सवाल:मुख्यमंत्र्यांच्या उपलब्धतेनुसार चर्चेचे सभापतींचे आश्वासन
March 17, 2026
0