Type Here to Get Search Results !

रवींद्र मेटकर यांना युकेचे निमंत्रण:ऑक्सफर्ड विद्यापीठात जागतिक संशोधन परिषदेत सहभागी होणार

अंजनगाव बारी नजीकच्या म्हसला येथील यशस्वी पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांना युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित जागतिक संशोधन परिषदेसाठी निमंत्रण मिळाले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमद्वारे आयोजित ही विशेष परिषद १ ते ५ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. संस्थेने मेटकर यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या जागतिक संशोधन परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना औपचारिकपणे आमंत्रित करताना संस्थेला आनंद होत आहे. रवींद्र मेटकर यांचा प्रतिकूलतेपासून समृद्धीकडे जाण्याचा प्रवास उल्लेखनीय आहे. शाश्वत शेती आणि कुक्कुटपालन ही त्यांची बलस्थाने असून, त्यांनी पोल्ट्री व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची प्रगती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मेटकर यांच्या पोल्ट्री व्यवसायाची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपये असून, ते १ लाख ८० हजार थर पक्ष्यांचे व्यवस्थापन करतात. त्यांचे हे कार्य भारताच्या कृषी क्षेत्रातील अपवादात्मक दूरदृष्टी, लवचिकता आणि नेतृत्व दर्शवते, असे अनेकांचे मत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भेटीअंती केलेल्या नोंदीनुसार, मेटकर यांचे एकात्मिक शेती, खर्चाचे ऑप्टिमायझेशन आणि हवामान-लवचिक शेतीमधील कार्य शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षेच्या व्यापक उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत आहे. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना प्रभावित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे खरोखरच एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योगदान आहे, असेही या नोंदींमध्ये नमूद आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0DIM3wf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.