पुणे येथे भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता संमेलनात राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातील शेतकरी आंदोलन परदेशी शक्तींच्या मदतीने घडवले जात असून, स्थिर सरकार पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनांना काँग्रेसकडून समर्थन मिळत असल्याचेही शिव प्रकाश म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या संमेलनात शिव प्रकाश यांनी 'राष्ट्र के विकास में भाजपा की भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर शहराध्यक्ष धीरज घाटे व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना मदत करत असतानाही आंदोलन घडवून आणले जात आहे, असे शिव प्रकाश म्हणाले. भाजप देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. देश सुरक्षित राहिला तरच विकास शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या अणुचाचणीच्या निर्णयामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात मजबूत झाला असून, अनेक देशांना शस्त्र निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदूर ऑपरेशननंतर भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढला आहे, असेही ते म्हणाले. समान नागरी कायद्याबाबत बोलताना शिव प्रकाश यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंडसह काही राज्यांत तो लागू झाला असून, लवकरच संपूर्ण देशात लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपच्या प्रवासाचा आढावा घेताना शिव प्रकाश म्हणाले की, जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास संघर्षाचा आहे. १९८४ साली फक्त दोन खासदार असलेल्या पक्षाची टिंगल झाली होती, मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी 'एक दिवस कमल खिलेगा' असा दिलेला विश्वास आज सत्यात उतरला आहे. १९९८-९९ मध्ये बहुमताने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने स्थिर सरकार दिले आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेले, असे त्यांनी सांगितले. आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, अशी टीकाही शिव प्रकाश यांनी केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5jR1viF
शेतकरी आंदोलन परदेशी शक्तींच्या मदतीने:देशाला अस्थिर करण्याचे षड्यंत्र - भाजप नेते शिव प्रकाश, काँग्रेसवरही जोरदार टीका
April 07, 2026
0