Type Here to Get Search Results !

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे' अशी या मार्गाची स्थिती झाली होती, ज्यामुळे पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक बनले होते. या रस्त्यावर अनेक अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर कुरेशी आणि अभ्यंकर यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता, ज्याला नागरिकांनीही जाहीर पाठिंबा दिला होता. खासदार बळवंतराव वानखडे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर फिरोज कुरेशी यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी खासदारांनी त्यांना शरबत पाजून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अघम, शाखा अभियंता राऊत, काँग्रेसचे प्रमोद दाळू, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख, सुधाकर टिपरे, कुशल चौधरी, मंगेश इंगळे, मूरसलीन खान, माजी पंचायत समिती सदस्य श्रीकांत पोटदुखे, भैय्यासाहेब अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, संतोष गावंडे, राजीक सौदागर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, प्रशासनाच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Vbgnroz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.