Type Here to Get Search Results !

प्रगतिशील शेतकरी:आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर, आता रेशीम शेतीवर वार्षिक 25 लाख कमाई; अकोल्यातील शेतकऱ्याची रेशीम कोष अन् तुती रोपांची विक्री

पारंपरिक आणि कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीला फाटा देऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली, तर शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता करोडोंची उलाढाल करणारा उद्योग बनू शकते, हे अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग गिऱ्हे यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवणारे पांडुरंग आज रेशीम कोष व तुती रोपांच्या विक्रीतून वर्षाला २५ लाख रुपयांची कमाई करत आहेत. पांडुरंग गिऱ्हे यांची आर्थिक स्थिती सुरुवातीला अत्यंत बेताची होती. मर्यादित संसाधने असतानाही त्यांनी २०११ मध्ये एका एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर रेशीम किड्यांच्या पालनाचा (सेरीकल्चर) धाडसी निर्णय घेतला. पहिल्याच वर्षी जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली त्यांना या व्यवसायात मोठे यश आले. रेशीम उद्योगातील बारकावे आणि तांत्रिक बाबी समजून घेतल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत आपल्या कौशल्याच्या जोरावर तुती लागवडीचा विस्तार साडेतीन एकरांपर्यंत केला. रेशीम किडे पालन आणि तुती रोपविक्रीचा साधला ताळमेळ गिऱ्हे यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांनी शेतीत केलेले तांत्रिक बदल आणि वेळेचे केलेले अचूक नियोजन. रेशीम किड्यांच्या अंडी खरेदीसाठी इतर बाह्य केंद्रांवर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःच अंडी तयार करण्याच्या कामात स्वयंपूर्णता मिळवली. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. यासोबतच त्यांनी दर्जेदार तुतीच्या रोपांची निर्मिती करून त्यांची विक्री करण्याचा एक उत्तम जोडधंदा सुरू केला. रेशीम किडे पालन आणि तुती रोपविक्री या दोन्ही घटकांचा अचूक ताळमेळ साधल्यामुळेच त्यांच्या वार्षिक उत्पन्नाने २५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. असे आहे खर्च उत्पन्नाचे गणित रेशीम उत्पादनाचा चक्रावधी कालावधी साधारणपणे एका महिन्याचा असतो. यात वेळेचे काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध श्रम आवश्यक असतात. अचूक व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी बाजारपेठेत आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला उत्पादित रेशीम कोष बंगळुरूच्या बाजारपेठेत पाठवावे लागायचे, मात्र आता बीड आणि जालना येथे हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बाजारात त्यांच्या दर्जेदार रेशीम कोषांना ६०० ते ७०० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. गिऱ्हे यांना रेशीम कोष विक्रीतून १० लाख रुपये उत्पन्न होतो. पण यात कोषासाठी औषधी, पावडर आदीसाठी निम्मा खर्च होतो. तर साडेतीन एकरवरील तुती रोपांच्या विक्रीतून १५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. यात लागवड, निंदणी, रोप काढण्यासाठी मजूरी असा ५ लाखांपर्यंत खर्च लागतो.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/It9owXr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.