Type Here to Get Search Results !

साताऱ्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश:कराडमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तर फलटणमध्ये 4 किलो गांजा जप्त

सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ड्रग्ज आणि गांजा जप्त करण्यात आला असून अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी तोडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. कराड आणि फलटणमध्ये एमडी ड्रग्जसह गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, कराडची गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि फलटण पोलिसांनी य कारवाया केल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर येत आहे. मात्र, पोलिस तस्करांची पाळेमुळे शोधून काढणार का? हा खरा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री जोमात सुरू आहे. राज्यात एखादी घटना घडली की पोलिस अलर्ट होतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील घटनांमध्ये आला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि फलटण शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने धुळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत धाड टाकत दोन सराईत गांजा तस्करांना पकडले. त्यांच्याकडून ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक बजाज प्लॅटिना मोटारसायकल आणि २ मोबाईल, असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अजित राजेंद्र कस्तुरे (रा. माळखांबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आदित्य रामचंद्र आतार (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. फलटण येथे कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू असताना, सोलापूरचे दोन इसम प्लॅटिना दुचाकीवरून (क्र. MH 12 HX 2649) धुळदेव गावच्या हद्दीत रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. एलसीबीचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे यांच्या संयुक्त पथकाने रावरामोशी पुलाजवळ सापळा रचून अजित कस्तुरे व आदित्य आतार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी व मोबाईलसह मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना गजाआड केले. कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या पथकासह कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने वांरुजी फाटा (कराड) येथे इनोव्हा गाडीमधून एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या समिर गुलाब शेख (रा. कोयना वसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सुर्यवशी मळा, कराड) यांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून 95.78 ग्रॅम एमडी (मेफोड्रोन) जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 3 मोबाईल, एक इनोव्हा गाडी, असा एकूण 18 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7EL0yZu

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.