अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत तेलंगणा राज्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमानी (ता. मालेगाव) परिसरातील एका पेट्रोल पंपावर एका कारमधून सात जण आले होते. त्यांनी कारमध्ये डिझेल भरल्यानंतर कर्मचाऱ्याला रोख पैसे दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी नोटांची बारीक पाहणी केली असता, त्या नोटांवर "Children Bank of India" असे लिहिलेले आढळून आले. नोटा नकली असल्याचा संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ मालेगाव पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित वाहनाची झडती घेतली. या तपासणीदरम्यान कारमध्ये बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी कारसह २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोठ्या रॅकेटची शक्यता, पोलिस तपास सुरू प्राथमिक तपासात या नोटा बाजारात व्यवहारात आणण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या टोळीचे धागेदोरे इतर जिल्हे किंवा राज्यांशी जोडलेले आहेत का, याचा तपास आता केला जात आहे. तसेच या बनावट नोटा वाशिम जिल्ह्यात किंवा अन्य कुठे व्यवहारात वापरल्या गेल्या आहेत का, याचा शोध घेण्यासाठी मालेगावचे ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांच्या अवैध व्यवहाराला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rb1GNnP
वाशिममध्ये पेट्रोल पंपावर नकली नोटांचा पर्दाफाश:तेलंगणातील 7 जण ताब्यात, 23.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त
May 30, 2026
0