Type Here to Get Search Results !

कात्रज मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू:ट्रक चालकाला बेड्या, हडपसर परिसरात घरफोडी

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, तो फिरस्ता असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ट्रक चालक विठ्ठल चांदराव गायकवाड (वय ३८, रा. पुरकी, चिमकी फाटा, चाकण, जि. पुणे, मूळ रा. किनाळा, जि. नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस शिपाई नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चारभुजा मार्बल दुकानासमोर भरधाव ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला होता. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिक प्रयत्न करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी या प्रकरणाचा तपास करत आहेत. हडपसर परिसरात घरफोडी, घराचे कुलूप तोडून दागिने लांबविले भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसरमधील बिराजदारनगर भागात घडली. याबाबत एका तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह हडपसरमधील बिराजदारनगर परिसरात राहायला आहे. २७ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास तक्रारदार तरुणाचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दुपारी एकच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले. तेव्हा घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने कपाटातील दागिने चोरल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7hf4YAB

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.