Type Here to Get Search Results !

राधाकृष्ण विखेंकडून मुलाच्या विधानानंतर सारवासारव:म्हणाले - साई भक्तांच्या भावना दुखावल्या मान्य, पण त्यांचा हेतू तसा नव्हता

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादलयात मिळणाऱ्या मोफत जेवणाबाबत आक्षेप व्यक्त केला होता. या प्रसादलयामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मुलाच्या विधानानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सुजय विखे यांच्या विधानाने भक्तांच्या भावना दुखावल्या मान्य आहे, परंतु त्यांचा हेतू तसा नव्हता, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? शिर्डीत येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी मोफत प्रसाद मिळाला पाहिजे. पण यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात काहीतरी नियमावली करावी लागेल, यासाठी सुजय विखे यांचे ते वक्तव्य होते. साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या प्रसादावर शुल्क आकारण्याची गरज नाही. प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. सूजय विखेंच्या विधानाचा विपर्यास झाला शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे स्थानिकांच्याही तक्रारी होत्या. नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडली पाहिजे म्हणून सुजय विखे यांनी तशी भूमिका मांडली, असे राधाकृष्ण विखे म्हणाले. सुजय विखे यांच्या विधानाचा विपर्यास झाला आहे. त्यांच्या विधानामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील, हे मी मान्य करतो. पण त्यांचा तसा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली. प्रसादलयाबाबत काय म्हणाले होते सुजय विखे? शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे, असे म्हणत या फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले असून शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे, असा दावा सुजय विखे यांनी केला आहे. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी देखील माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. हे मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Zyx9iYM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.