गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून एका व्यक्तीने मुंबई आणि उपनगरातील सुमारे ३ लाख लोकांना काेट्यावधी रुपयांना चुना लावल्याचे प्रकरण सोमवारी समोर आले. टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना ५ वर्षांत दुप्पट, ७ वर्षांत तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. या कंपनीच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. सोमवारी गुंतवणूक केलेल्या नागरिकांची या ठिकाणी गर्दी झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्कोचे सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, जनरल मॅनेजर तानिया कोसाटोवा आणि कंपनी स्टोअर इनचार्ज व्हॅलेंटिना कुमार, यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करून १३ काेटींची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेस गुंतवणूक कंपनी असे या कंपनीचे नाव आहे. नवी मुंबईसह, दादर, सानपडा, मीरारोड, कांदिवली, कल्याण, ग्रँट रोड परिसरात अशा एकूण ६ शाखा या कंपनीच्या आहेत. पैसे जमा झाल्यानंतर एकाच वेळी सर्व शाखांना टाळे ठोकून कंपनीचा मालक फरार झाला. या कंपनीने ३ टक्के ते ११ टक्के असा परतावा मिळेल, असे आमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितले. संबंधित कंपनीचे कर्मचारी भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या एका शोरूममार्फत लोकांना पैसे गुंतवण्यास सांगत. त्यांना काही रक्कम वर्षभर फायद्याच्या स्वरूपात मिळणार असल्याचे सांगून पैसे गुंतवून घेण्यात आले होते. मात्र, सोमवारी अचानक शोरूम बंद झाल्याने लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आठवड्याला मिळणार होते पैसे कंपनीत लोकांनी पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारीप्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले होते. सुरुवातीला पैसे जमाही झाले. सोमवारी सकाळी अचानक शोरूमचे दादर येथील मुख्य कार्यालय बंद झाले. त्यापाठोपाठ मीरा, भाईंदरमधील देखील शोरूम बंद करण्यात आले. शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी झाली होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/EyAscdg
मुंबईत दामदुपटीचे आमिष देत तीन लाख लोकांना कोट्यवधींचा गंडा:टोरेस कंपनीच्या चार जणांवर गुन्हा दाखल
January 06, 2025
0