Type Here to Get Search Results !

भिवंडीत आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक:पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान, तर एक पोलिस शिपाई जखमी

भिवंडी शहरात पोलिसांच्या वाहनावर स्थानिक जमावाने तूफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस भिवंडी या भागात गेले होते. मात्र येथील स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे. भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमधील मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून भांडण झाले होते. यात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली. घाबरलेल्या मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पालकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यास मिळताच पोलिस आयजीएम रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला. आरोपी हे वऱ्हाळ देवी नगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती घेतल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार आणि सुनील शिंदे, तडवी हे पथक पोलिस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले. या वेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलिस पथकासोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा आणि आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 30 ते 40 जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलिस वाहनावर दगडफेक करत हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस शिपाई तडवी यांना दगड लागला आणि त्यात ते जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या जीपवर देखील दगडफेक करत गाडीचे मोठे नुकसान केले. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या आईकडून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली असून यात जवळपास 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरपीआय आठवले गटाचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांचे सुपुत्र उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन उर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे आणि इतर 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bRPqYMh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.