तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी सहायक योगेश शिवराम सोनवणे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका सहायकावर गुन्हा दाखल झाला. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती. त्यात कार्यालयात होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे त्यांनी स्पष्ट केली. योगेश सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायक मानसिक त्रास देत होते. अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम लावले जात होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मृताच्या पत्नी विमल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे आणि कृषी सहायक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार, ज्ञानेश्वर कायंदे करत आहेत. नातेवाइकांचा ठिय्या घटनेनंतर दिवसभर नातेवाइकांनी सिल्लोड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. आत्महत्येचे खरे कारण शोधून गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. अखेर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जळगावात अंत्यसंस्कार सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा जैनाबाद, जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. घटनेपूर्वी सहकाऱ्याला फोन सकाळी ८.१५ वा. सोनवणे यांनी वरिष्ठांकडून कार्यालयाची चावी आणली. त्यानंतर शिपाई पठाण यांना फोन करून “कुठे आहात?’ विचारले. “तुम्ही लवकर येऊ नका’ असेही सांगितले. त्यानंतर शिपाई ९.१५ वाजता आले. दरवाजा उघडला असता सोनवणे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/V4U5arj