औरंगजेब कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले आहेत. कबरीपासून जवळपास ५० मीटर अंतरावर बॅरिकेड लावले असून तेथे सुमारे १५ पोलिसांची नेमणूक केली आहे. ५० मीटर अंतरात ४ ठिकाणी तपासणी केली जात आहे. कबर परिसरात १७ सीसीटीव्ही आहेत. त्याचबरोबर संपूर्ण संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण लावण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचे आदेश रविवारी (२३ मार्च) जारी केले आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाने पत्र जारी केले आहे. तसेच कबरीच्या परिसरात पर्यटकांना मोबाइल बाहेर ठेवण्यास सक्त सूचना दिल्या जात आहेत. या परिसरात फोटो, रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबरीविरोधात भूमिका घेतली आहे. ती उखडून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १८ दिवसांपासून वाद सुरू आहे. आधार कार्ड नंबरची केली जाते नोंद पोलिस प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत. कबरीच्या दोन किमी अंतरावर पोलिसांनी मुख्य चार रस्त्यांवर बॅरिकेड लावले आहेत. या प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जात आहे. कबर पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांची एका रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात आहे. यात नाव, कोठून आले, मोबाइल क्रमांक, आधार कार्ड किंवा पॅन कार्डची नोंद केली जात आहे. मोबाइल बाहेरच ठेवण्यास सांगितले जात आहे. जमावबंदीचे आदेश पोलिस आयुक्तालय हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीसह शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. येत्या काही दिवसांत येणाऱ्या सण-उत्सवाच्या काळात शहरात सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकाच वेळी जमण्यास बंदी असणार आहे. संभाजीनगर जिल्हाबंदी केल्यानंतर ‘तो’ तरुण पुन्हा क्रांती चौकात; तरुणासह चौघांवर गुन्हा दाखल औरंगजेब कबरीस टाळेबंदी करण्याची मागणी करणाऱ्या तरुणावर जिल्हाबंदी केली. त्यानंतरही दोन वेळा जिल्ह्यात प्रवेश करून औरंगजेबाच्या कबरीकडे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. रविवारी तो दुपारी दीड वाजता क्रांती चौकात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे प्रमुख बाळराजे आवारे क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन खुलताबादकडे जाण्याच्या तयारीत होते. त्या वेळी क्रांती चौक पोलिसांनी त्यांच्यासह चौघांना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाळराजे रामराव आवारे (३५, रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना), प्रवीण डिकले (३६, रा. तांदुळवाडी, ता. कळंब, जि. धारशिव), संदीप उत्तरेश्वर चाळक (२९, रा. केज, ता. केज, जि. बीड) व गणेश सर्जेराव पवार (३६, रा. महाकाळा) यांच्यावर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांनी कुठल्याही प्रकारची पर्यटकांना बंदी घातलेली नाही. खबरदारी म्हणून कबरस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये. - डॉ. विनयकुमार राठोड, अधीक्षक, ग्रामीण पोलिस.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AjkHIsp
औरंगजेब कबर परिसरात कडक प्रतिबंध; 17 सीसीटीव्हींद्वारे नजर:पर्यटकांना फोटो काढणे, रील्स बनवण्यावर बंदी
March 23, 2025
0