"ओ री चिरैय्या नन्ही सी चिडिया अंगणामे फिर आजा रे , किरणोके तिनके, अंबरसे चुनके अंगणामे फिर आजा रे " एक टुमदार घर , घरासमोर हिरवा गालिचा अंथरल्या सारखी बाग, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी नुकतीच पसरायला सुरुवात केलेली , फुलांवर टपोरे दवबिंदू आणि आंब्याच्या झाडावर घरट्यातून बाहेर येत चिवचिवाट करणाऱ्या चिव चिव चिमण्या. खरेतर हे दृश्य आता शहरात तरी पाहायला मिळत नाही . त्यामुळे आजच्या पिढीला 'चिमणी' हि केवळ टेलिव्हिजनवरच पाहायला मिळते. चिमण्यांची चिव चिव ही आता दुर्मिळ झाली आहे. भारतात आठ प्रजातींच्या चिमण्या आढळतात. आपल्या लहानपणी चिऊ-काऊच्या गोष्टीमधील चिमणीचे नाव हाऊस स्पॅरो असे आहे. यातील काही चिमण्या इतर राज्यांत आढळतात. जंगलात, डोंगरकपारीत, वाळवंटात, तसेच बर्फाळ प्रदेशातही चिमण्यांच्या काही प्रजाती आढळतात. यल्लो थ्रोटेड स्पॅरो म्हणजेच पीतकंठी चिमणी या चिमण्यांच्या दुर्मीळ प्रजातींचा छत्रपती संभाजीनगर मधील काही हिरवळीच्या भागात वावर वाढला असल्याची सकारात्मक बाब पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आली आहे. शहरातील हिमायतबाग, विद्यापीठ परिसरातल्या दाट झाडी असलेल्या भागात यल्लो थ्रोटेड स्पॅरोंचा वावर असतो असे कुणाल विभांडिक यांनी सांगितले. 'चिऊताई, चिऊताई दार उघड' या गाण्यांच्या ओळी आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. पण आज हीच चिऊताई समस्त मानवजातीवर रुसून कुठेतरी दूर निघून गेली आहे. येणाऱ्या पिढीला 'एक घास चिऊचा, एक घास काऊचा' हे म्हणण्यासाठी, नकारात्मकतेत हरवलेल्या मनाला चिमण्यांच्या चिवचिवाटाने उभारी मिळण्यासाठी, दुःखी, कष्टी झालेल्या मनाला हर्षोउल्हासित करण्यासाठी चिमणाताई ही हवीच, त्यामुळे रुसलेल्या चिमण्यांना परत आणणे आणि त्यांना टिकवणे, वाढवणे हे आज आपले प्रमुख कर्तव्य झाले आहे. चिमणी वाचवा या चळवळीसाठी 20 मार्च हा दिवस जगभरात 'चिमणी दिन' म्हणून पाळण्यात येतो. 'बाप म्हणायचा काढलेली नखं दारात कधीच नयेत टाकू दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडी फाटू फाटू सुगी संपली की बाप देवळात नेऊन कणसं बांधायचा सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा पाखरं असल्या तरी ओळखायच्या बापाच्या मनीचा भाव तेव्हा सुगी संपली तरीही चिमण्या सोडीत नसायच्या गाव' मराठवाड्यातल्या परभणीचे कवी इंद्रजित भालेराव यांची ही कविता आज आठवल्याशिवाय रहात नाही. पूर्वी सुंदर सकाळी आणि रम्य अशा संध्याकाळी सुद्धा चिमण्यांचा चिवचिवाट माणसाला निसर्गाच्या जवळ नेत असे.काही वर्षांपूर्वी घरातील महिलांनी अंगणात वाळत घातलेले धान्य चिमण्या आणि इतर पाखरांनी टिपू नये म्हणून हातात काठी घेऊन त्याचे राखण केले जायचे आणि आज त्याच चिमण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिन साजरा करण्याची वेळ माणसांवर आली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या व इतर पक्ष्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्येही मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल, त्या जागेंवर उभ्या राहणाऱ्या मोठमोठ्या इमारती, घरे यांमुळे चिमण्यांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. तसेच माणसाची अत्यावश्यक गरज म्हणजे मोबाईल फोन. या फोन्सच्या टॉवर्समधून निघणाऱ्या हानिकारक किरणांमुळे,विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे चिमण्यांना नुकसान पोहोचू लागले. अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर. यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी झाली.त्या शहरातून जणू हद्दपारच झाल्या. आजचा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. पर्यावरणाचे किमयागार डॉ. दिलीप यार्दी चिमण्या झाडांवर घरटे करत नाहीत. त्या मोठ्या छिद्रामध्ये, बाल्कनीत, कोपऱ्यात किंवा दोन भिंतींमधील जागेत घरटे करतात. मात्र, शहरीकरणामुळे पारंपरिक घराऐवजी बॉक्स टाइप फ्लॅट व काचेच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना जागा शिल्लक नाही. त्यासाठी डॉ. दिलीप यार्दी यांची संस्था एनव्हायरमेन्टल रिसर्च फाऊंडेशनने घरट्यांची संकल्पना रुजवली. या अभियानात संस्थेची टीम शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांत जाऊन जनजागृती करतात. विद्यार्थ्यांना ते स्वतः घरटी करायला शिकवतात. यामध्ये डॉ. दिलीप यार्दी यांच्यासोबत संदीप भाले, कुणाल विभांडिक, स्वरदा जोशी यांच्यासह अनेक तरुण स्वंयस्फूर्तीने काम करतात. चिमण्यांची कमी झालेली संख्या आणि आता चिमण्या वाढवण्यासाठी काय उपाय करावे? हे जाणून घेण्यासाठी जेष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांच्याकडून 'दिव्य मराठी डिजिटल'ने चिमण्यांबद्दल जाणून घेतले. राज्यात तसेच शहरात चिमण्यांची एकूण संख्या किती? याबाबत त्यांना विचारले असता आतापर्यंत चिमण्यांची अथवा कुठल्याही पक्षांची गणना झालेली नसल्याची माहिती समोर आली. डॉ. दिलीप यार्दी म्हणाले, 2005 साली सर्वप्रथम युरोपमध्ये त्यानंतर जर्मनी, इटली, नेदरलँड या देशांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली. या देशांमध्ये चिमण्यांची संख्या 85 टक्क्यांनी कमी झाल्याचे एका अभ्यासात समोर आले. तर भारतात त्याही नंतर अगदी 2010 मध्ये ग्रामीण भागात 30 ते 40 टक्के तर शहरी भागात 60 ते 70 टक्के चिमण्यांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली. आणि त्यानंतर चिमण्या का नाहीशा झाल्या? याबाबत विचारमंथन सुरू झाले. डॉ. दिलीप यार्दी यांनी चिमण्या कमी होण्याची पुढील कारणे सांगितली. चिमण्या कमी होण्याची कारणे ? चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत डॉ. यार्दींनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. चिमण्यांचे घरच आपण घेतले डॉ. दिलीप यार्दी म्हणाले, मानवाने नेहमीची राहण्याची वृत्ती बदलून चंगळवादी कृती सुरू केली. यामुळेच चिमण्या कमी व्हायला सुरुवात झाली. चिमण्यांचे कमी होण्याचे मुख्य कारण मानवाची बदललेली जीवनशैली, हे आपल्याला ठामपणे सांगता येईल. चिमण्या कमी होण्याचा विचार जर केला तर, भारतात घरात घरातील फोटो फ्रेमच्या मागे त्यांचे घरटे असायचे. नवीन वास्तू शास्त्राप्रमाणे घरे बांधण्यात येतात. गुळगुळीत घरात मच्छर देखील येऊ नये यासाठी लावलेल्या स्लाइडिंग खिडक्या यामुळे आपण चिमण्यांना घरातून हाकलून दिले. घरात राहणाऱ्या चिमण्यांना हाकलून दिले तर त्या राहतील कुठे. चिमण्यांना राहण्याची, खाण्याची आणि निवाऱ्याची सोय अत्यंत गरजेची आहे. तेच आपण हिरावून घेतली. चिमण्यांचे आपल्यावर अनंत उपकार डॉ. दिलीप यार्दी यांनी चिमण्यांचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. ते म्हणाले, चिन या देशामध्ये तांदळाच्या शेतात चिमण्या यायच्या. त्यावेळी फर्मान निघाले. चिमण्या मारुन टाका. त्यानंतर सर्व चिमण्या मारुन टाकल्या. आणि पिकांच्या उत्पादनात आलेला फरक सर्वांना दिसून आला. चिमण्या या पिकांवरील किडे खातात. चिमणी आपल्या पिलाला दिवसातून 220 घास भरवते. यातून आपल्या आजूबाजूचे सर्व किटक ती नष्ट करते आणि निरोगी वातावरण तयार करते. विद्यापीठात आम्ही 65 घरटी ठेवली. ही नवी घरे त्यांनी स्विकारली. याठिकाणी त्यांचा संसार सुरु झाला आहे. स्पॅरोमॅन संदीप भाले शहरातील स्पॅरोमॅन म्हणून ओळख असणाऱ्या संदीप भाले यांनी आत्तापर्यंत 25 हजार चिमण्यांची घरटी मोफत वितरित केली आहेत. ते लाकडापासून, घरच्या घरीच ही घरटी बनवतात आणि एका व्यक्तीला एक याप्रमाणे मोफत देतात. चिमण्या वाचवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणारे अनेक पर्यावरणप्रेमी पुढाकार घेत आहेत. त्यापैकी संदीप भाले एक आहेत. यासाठी त्यांनी 'एचटूओ अँड सॉइल एनव्हायर्नमेंट रिसर्च फाउंडेशन' ही संस्था स्थापन केली. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 2019 मध्ये 'घर तिथे घरटी' हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्यांनी घरटी विकत आणून त्यांचे लोकांना वितरण केले. मात्र, ते खर्चिक असल्याने त्यांनी स्वतःचं घरटी तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी खास प्रशिक्षणही घेतले व घरटी बनवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना सुमीत भाले, आनंद लंगोटे, नितीन सोनगीरकर यांचे सहकार्य असते. सहवासिनीला वाचवले पाहिजे-किशोर गठडी निसर्गमित्र मंडळ सचिव व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे सहसंघटक किशोर गठडी यांनी जागतिक चिमणी दिवसाचे उद्दिष्ट सांगितले. ते म्हणाले, हा दिवस पर्यावरणाच्या आरोग्याचे संकेत देणाऱ्या चिमणीला वाचवण्याचा वैज्ञानिक प्रयत्न आहे. चिमणी 'किन्स्टोन स्पीशीज' नसली, तरी तिची उपस्थिती आपल्या परिसंस्थेचे संतुलन दर्शवते. हा दिवस शाश्वत विकास आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कृती करण्याची प्रेरणा देतो. चिमणी छोटी असली, तरी तिचे जैवविविधतेतील योगदान आणि पर्यावरणीय महत्त्व अफाट आहे. जागतिक चिमणी दिवस आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडण्याची संधी देतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, चिमण्यांचे संरक्षण हे संपूर्ण परिसंस्थेचे रक्षण आहे. नागरिकांनी एकत्र येऊन या छोट्या सहवासिनीला वाचवले पाहिजे, जेणेकरून पुढील पिढ्याही त्यांच्या चिवचिवाटाचा आनंद घेऊ शकतील.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/XAPOlWd
ओ री चिरैय्या, अंगणामे फिर आजा रे:संभाजीनगरमध्ये वाढलाय दुर्मिळ यल्लो थ्रोटेड 'पीतकंठी' चिमण्यांचा वावर, जागतिक चिमणी दिनी वाचा चिमणाताईची गोष्ट...!
March 19, 2025
0